‘ईटीएस’ मशीन ठरवणार भूस्खलनग्रस्तांच्या शेतांचे बांध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:44 AM2021-08-12T04:44:36+5:302021-08-12T04:44:36+5:30

सातारा : गावागावांमध्ये बांधावरून असणारी भांडणं सर्वज्ञात आहेत. भूस्खलनामुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये शेतजमिनींवर डोंगरातील दगड-माती साठली आहे. ही माती ...

The ‘ETS’ machine will determine the dams of the landslide affected farms | ‘ईटीएस’ मशीन ठरवणार भूस्खलनग्रस्तांच्या शेतांचे बांध

‘ईटीएस’ मशीन ठरवणार भूस्खलनग्रस्तांच्या शेतांचे बांध

Next

सातारा : गावागावांमध्ये बांधावरून असणारी भांडणं सर्वज्ञात आहेत. भूस्खलनामुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये शेतजमिनींवर डोंगरातील दगड-माती साठली आहे. ही माती काढता येणं शक्य नसल्याने मोजणी खात्याकडील नकाशे आणि ‘ईटीएस’ मशीन शेताच्या बांधांची हद्द ठरविणार आहेत. शेतातील माती आहे तशीच ठेवल्याने काहींची शेती उंचावर तर काहींची खोलात जाण्याची शक्यता असल्याने गावागावांमध्ये पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टी, भूस्खलन, महापूर या नैसर्गिक आपत्तीने जिल्ह्यातील १६७ गावे पूर्णत: बाधित झाली आहेत. त्यातील सुमारे ६८ गावे डोंगर उतारावर असल्याने तिथं शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. बहुतांश ठिकाणी भूस्खलनाने अवघे डोंगरच शेत जमिनीवर पडल्याने शेती पन्नास फुटांहून अधिक खोल गाडली गेली आहे. प्रशासकीय पातळीवर पन्नास फुटांवर असलेला गाळ काढणं अशक्य आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीसह मनुष्यबळही शासनाकडे उपलब्ध नाही.

चौकट :

असं असतं ‘ईटीएस’ मशीन

इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन अर्थात ‘ईटीएस’ हे एक इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट थियोडोलाइट आहे. हे यंत्रावर इलेक्ट्रॉनिक अंतर मोजमापासह एकत्रित केले आहे. जे दोन्ही अनुलंब आणि क्षैतिज कोन मोजण्यासाठी आणि इन्स्ट्रुमेंटपासून विशिष्ट बिंदूपर्यंत उतार अंतर आणि डेटा गोळा करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्रिकोणी गणना करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

गाळावरच करावी लागणार शेती

डोंगरउतारासह नदी काठाला असलेल्या जमिनींमध्ये पाणी गाळ आणि वाहून आलेली दगडं साठली आहेत. शेतात आलेल्या या गाळावरच शेतकऱ्यांना शेती करण्याची वेळ येणार आहे. पाच ते सात फुटावर असलेला गाळ काढण्याची तयारी करण्यात आली आहे. मात्र, त्याहून अधिक साठलेला गाळ काढणं शक्य नसल्याने वाहून आलेल्या मलब्यावरच शेती करावी लागणार आहे.

गाळ काढायला स्थानिकांना आवाहन

जिल्ह्यात पुरासह भूस्खलनाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. डोंगर उतारावर असलेल्या शेतीत बहुतांश ठिकाणी डोंगराचे कडे आणि दगड ओघळून आले आहेत. हा सर्व गाळ काढण्याइतकी यंत्रणा शासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे स्थानिकांनी त्यांच्याकडील जेसीबी, पोकलेन उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्याच्या मानसिकतेत प्रशासन आहे. या वाहनांसाठी लागणारे इंधन देण्याची जबाबदारी शासन घेण्यास तयार आहे.

कोट :

भूस्खलन आणि पूरपरिस्थितीमुळे लोकांच्या घरांसह शेतीचेही नुकसान झाले आहे. शासन स्तरावर नुकसानभरपाई देण्याबरोबरच पंचनामे करण्याचे कामही सुरू आहे. डोंगरावरून वाहून आलेला गाळ शेतातून काढणं शक्य नाही, पण त्यांच्या बांधांच्या हद्दी ‘ईटीस’द्वारे निश्चित करण्यात येतील.

- श्रीरंग तांबे, प्रांताधिकारी, पाटण

बांधावरच्या भांडणांना खूप जुना इतिहास आहे. मशीनद्वारे जरी जागेची मोजणी झाली तरीही त्यातून शेतकऱ्यांचे समाधान होणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे आहे तिथेच जागा देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणं शासन आणि अधिकाऱ्यांनी बंद करावं. शेतकऱ्यावर अस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकटे आले, त्यांचा संवेदनशीलपणे विचार व्हावा.

- विक्रमबाबा पाटणकर, जिल्हा परिषद, माजी उपाध्यक्ष.

Web Title: The ‘ETS’ machine will determine the dams of the landslide affected farms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.