गोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ, व्यापारी निमसोडच्या बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 05:57 PM2020-01-08T17:57:45+5:302020-01-08T17:58:57+5:30
दुष्काळ, अतिवृष्टी अन् त्यानंतर कोसळलेल्या अवकाळी पावसाने ह्यहोत्याचे नव्हते केले.ह्ण पण या संकटांसमोर न झुकता त्यावर मात करीत जिगरबाज शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलवल्या. गेल्या वर्षी याच बागांमधील गोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ पाडली होती. त्यामुळेच यंदा युरोपातील अनेक व्यापाऱ्यांची पावले खटाव तालुक्यातील निमसोडच्या द्राक्ष शेतीच्या बांधांवर वळाली आहेत.
स्वप्नील शिंदे
सातारा : दुष्काळ, अतिवृष्टी अन् त्यानंतर कोसळलेल्या अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले. पण या संकटांसमोर न झुकता त्यावर मात करीत जिगरबाज शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा फुलवल्या. गेल्या वर्षी याच बागांमधील गोड द्राक्षाच्या चवीने युरोपीयन ग्राहकांना भुरळ पाडली होती. त्यामुळेच यंदा युरोपातील अनेक व्यापाऱ्यांची पावले खटाव तालुक्यातील निमसोडच्या द्राक्ष शेतीच्या बांधांवर वळाली आहेत.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यात उन्हाळ्यात दरवर्षी पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. मात्र, काही शेतकरी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून डाळिंब, द्राक्ष आणि इतर पिकांद्वारे आपली शेती फुलवली आहे. मायणी परिसरात तर द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात सुमारे ४१६ हेक्टरवर द्राक्षाचा बागा आहेत.
यंदा मे महिन्यात दुष्काळामुळे पाणी टंचाई निर्माण झाली होती. अशावेळी शेतकऱ्यांनी ५० किलोमीटरवरून टँकरने पाणी विकत आणून बागा जगविल्या. अनेक गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली. तसेच शेततळी उभारून पाण्याची व्यवस्था केली. पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने बागांची छाटणी केली; पण त्याच वेळी अवकाळी पाऊस पडल्याने बागांचे मोठे नुकसान झाले.
संकटावर मात करण्याचा निर्धार करून शेतकरी कामाला लागले. पुन्हा बागा वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू करून तब्बल ४१७ जिगरबाज शेतकऱ्यांनी युरोप आणि आखाती देशांमध्ये द्राक्षाची निर्यात करण्यासाठी शासनाकडे नोंदणी केली.
खटाव तालुक्यामध्ये पिकविल्या जाणाऱ्या द्राक्षाला युरोपामधील अनेक देशांमध्ये चांगली मागणी आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांशी करार करण्यासाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधवर पोहोचले आहेत. त्यांनी बागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी प्राथमिक बोलणी केली आहे. त्यानंतर त्यांच्याशी करार केला जाणार आहे.
सध्या आफ्रिकेत द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. भारतातील द्राक्षाला युरोपात चांगली मागणी असून, येथील बागांची इतर देशांपेक्षा खटाव परिसरात चांगली निगा राखली जात आहे.
- यॉन व्हॅन अॅडल,
व्यापारी, नेदरलँड