अस्मानी संकटानंतरही लोक उभे राहतायत!,प्रशासन खंबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 02:10 PM2021-07-30T14:10:06+5:302021-07-30T14:11:43+5:30

Rain Flood Satara :सातारा जिल्ह्यातील तब्बल ४१६ गावांना अतिवृष्टीने कवेत घेतले. ४६ माणसं हिरावून नेली. कष्टानं उभं केलेलं घर, पेरलेलं पीक अन पाळीव जनावरं मातीत गाडली गेली. एवढं सारं झालं असलं तरी राजकीय नेते मंडळी, प्रशासन अन् सजग नागरिकांमुळे जगलेली माणसं पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करतायत!

Even after the emergency, people are still standing !, the administration is strong | अस्मानी संकटानंतरही लोक उभे राहतायत!,प्रशासन खंबीर

 पाटण तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना प्रशासनाच्यावतीने केरोसीनचे वाटप करण्यात आले आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देअस्मानी संकटानंतरही लोक उभे राहतायत!,प्रशासन खंबीर जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांना विविध सेवाभावी संस्थाकडून मदतीचा ओघ सुरु

सागर गुजर

सातारा : जिल्ह्यातील तब्बल ४१६ गावांना अतिवृष्टीने कवेत घेतले. ४६ माणसं हिरावून नेली. कष्टानं उभं केलेलं घर, पेरलेलं पीक अन पाळीव जनावरं मातीत गाडली गेली. एवढं सारं झालं असलं तरी राजकीय नेते मंडळी, प्रशासन अन् सजग नागरिकांमुळे जगलेली माणसं पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करतायत!

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत देण्याच्या दृष्टीने मदत कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखा येथे करण्यात आली आहे. या शाखेचे पथक प्रमुख जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते या असून जिल्ह्यातील सामाजिक संघटना, संस्था तसेच नागरिकांनी मदत दयावयाची असेल त्यांनी जिल्हा पुरवठा शाखेत मदत जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले, त्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत पोहचणे आवश्यक असल्याने बिस्कीट, चिवडा, फरसाण, राजगिरा लाडू या स्वरुपामध्ये स्नॅक्स तसेच साखर, तांदूळ, आटा, डाळ, तेल, तिखट, मीठ इतर कोरडा शिधा तसेच ब्लँकेट, चादरी, टॉवेल, ताडपत्री अशा स्वरुपाची मदत करण्याचे आवाहन कक्षामार्फत करण्यात आले होते.

जिल्ह्यातील सामाजिक संघटना व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसादानंतर जमा झालेल्या मदत तातडीने पाटण, जावली व महाबळेश्वर तालुक्यात पाठविण्यात आली आहे. मदत ही संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांमार्फत गरजूंना वाटप करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून २४ जुलै च्या शासन निर्णयानुसार पुरबाधीत कुटुंबांना प्रतीकुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ व ५ लिटर कोरोसीनचेही वाटप करण्या आले आहे. वाटप हे ग्रामदक्षता समिती सदस्यांसमोर करण्याची सूचना देण्यात आली असून वाटपात गैरप्रकार केल्यास संबंधितावर गंभीर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात पुरग्रस्तांसाठी मदत दिली आहे. यामध्ये सातारा तालुका रेशन दुकान संघटना, शंकर बर्गे, सुलतानवाडी ता. कोरेगाव, संजय निकम, जयंत गरज, कोविड डिफेडर ग्रुप, सातारा, मच्छींद्र गोरे, सातारा, हेमंत त्रिगुणे, श्रीकांत शेटे, सातारा, तहसील कार्यालय, सातारा, पार्ले-जी कंपनी, शुभम-इन हॉटेल, क्रेडाई, सातारा, श्री स्वामी सेवा मेडिकल फौंडेशन, एमएसडब्ल्यु महाविद्यालय, जकातवाडी, अण्णासाहेब कल्याणी माजी विद्यार्थी बॅच, जाणीव विकास स. संस्था, दिलीप देशमुख, मे. पालेकर फूड, विठ्ठल भोसले, कांचन शेटे, राजधानी हॉटेल ॲन्ड रेस्टॉरंट असो. सातारा, कोडोली कृतज्ञता मंच व कोडोली ग्रामस्थ, बौद्ध विकास तरुण मंडळ लिंब, मार्सिया मेटर इंडिया, सातारा, पोदार इंटरनॅशनल स्कूल, वसुंधरा पर्यावरण संस्था व सातारा व कोरेगाव येथील शासकीय गोदामातील व वाहतुकदारांचे हमाल कामगार यांनी पुरग्रस्तांसाठी मदत जिल्हा पुरवठा कार्यालयात जमा केली आहे.

याव्यतिरिक्त जिल्ह्यातील छोट्या छोट्या मित्र मंडळांनी, सार्वजनिक उत्सव मंडळांनी आपल्या परीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

पुनर्वसनाचे काम करण्यावरही भर

पाटण, वाई, जावली, महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे. पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्सखलन झाले असल्याने बाधित लोक भयग्रस्त असल्याने आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी या लोकांनी नोडल अधिकारी संजय आसवले यांच्यासमोर केली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडेही मागील आठवड्यात हीच मागणी करण्यात आलेली होती.

 

 

Web Title: Even after the emergency, people are still standing !, the administration is strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.