रजोनिवृत्तीनंतरही ‘ती’ आई होणार
By admin | Published: July 1, 2015 11:09 PM2015-07-01T23:09:24+5:302015-07-02T00:23:32+5:30
पन्नाशीतील मातृत्व : माउली टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे यश
सातारा : आई होण्याची तारुण्यात अपुरी राहिलेली इच्छा उतारवयात पूर्ण करून घेण्याची संधी येथील एका महिलेला मिळाली आहे. रजोनिवृत्तीनंतर चार वर्षांनी या महिलेला गर्भ राहिला असून, माउली टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे डॉ. रूपेश काटकर यांनी केलेल्या उपचारांना यश आले आहे.डॉ. काटकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. पूनम विजय शिंदे (नाव बदलले आहे) या लग्नानंतर २६ वर्षांत एकदाच डॉक्टरची पायरी चढल्या होत्या, तेही गर्भ राहत नाही याच कारणासाठी. या कारणासाठी उपचार घेऊन काय उपयोग, असे जुन्या काळातील सासू-सासरे त्यांना नेहमी म्हणत असत. त्यातच वयाच्या ४६ व्या वर्षी पूनम यांना रजोनिवृत्ती आली.
टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान वापरून तारुण्यात अपत्यप्राप्ती होऊ शकते; पण पूनम यांना रजोनिवृत्तीही आली होती. त्यांचे वय ५० असताना त्यांच्यावर डॉ. काटकर यांनी उपचार सुरू केले. रजोनिवृत्तीनंतर गर्भाशयाचा आकार लहान होतो. त्यावर औषधोपचार करून गर्भाशय पूर्वस्थितीत आणण्यात त्यांनी आधी यश मिळविले. मासिक पाळी व्यवस्थित सुरू झाल्यानंतर जूनमध्ये टेस्ट ट्यूब तंंत्रज्ञान वापरण्यात आले. अधिक वयातही वंध्यत्वावर मात करून मातृत्व देणारी ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असून, मुंबईत जागतिक कीर्तीच्या मान्यवर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या अभ्यासाचा या महिलेवर उपचार करताना उपयोग झाल्याचे डॉ. काटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)