आधुनिकतेच्या जमान्यातही डालगं, कणगीची विण घट्ट, संसारोपयोगी वस्तू तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 03:12 PM2020-07-27T15:12:50+5:302020-07-27T15:14:27+5:30
आधुनिकतेच्या जमान्यात अनेक संसारोपयोगी वस्तू प्लास्टिकपासून मिळत आहेत. त्यातही सातारा तालुक्यातील कास परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील भागात बहुतांशी ठिकाणी पारंपरिक वस्तू तयार केल्या जात आहेत. बांबूपासून टोपली, डालगं, कणगी, डाल, सुप अशा अनेकविध वस्तू तयार करत पारंपरिकतेची विण घट्ट केली आहे.
पेट्री/सातारा : आधुनिकतेच्या जमान्यात अनेक संसारोपयोगी वस्तू प्लास्टिकपासून मिळत आहेत. त्यातही सातारा तालुक्यातील कास परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील भागात बहुतांशी ठिकाणी पारंपरिक वस्तू तयार केल्या जात आहेत. बांबूपासून टोपली, डालगं, कणगी, डाल, सुप अशा अनेकविध वस्तू तयार करत पारंपरिकतेची विण घट्ट केली आहे.
सातारा शहराच्या पश्चिमेस कास परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावात शेती, घरकाम, व्यवसायासंदर्भात अनेकविध पारंपरिक पद्धती आजही जोपासल्या जात आहेत. हा सर्व पारंपरिक वारसा जतन होत असल्याचे चित्र प्रकर्षाने अनुभवास मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठाराच्या परिसरातील अतिदुर्गम व डोंगरमाथ्यावरील भागात पर्जन्यवृष्टीचे प्रमाण मोठ्या स्वरुपात असते. या परिसरातील शेती मुख्यत: पावसावर अवलंबून असल्याने येथील शेतकरी प्रामुख्याने भात, नाचणी, वरी ही पिके घेतात.
निसर्गाचे बदलते ऋतुचक्र तसेच हातातोंडाशी आलेल्या पिकांचे वन्य पशुपक्ष्यांकडून होत असलेली नासधुस यामुळे शेती करण्याचे प्रमाणही कमी होत चालले आहे. अनेकजण उदरनिवार्हासाठी तसेच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पुणे, मुंबई शहराचा मार्ग स्वीकारतात. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊनपूर्वीच अनेक चाकरमानी कुटुंबासमवेत आपापल्या गावात दाखल झाली होती.
अनेक चाकरमानीचा गावात शेती करण्याचा कल वाढला आहे. यंदा शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. गावाकडे असणारे शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर गाई, म्हशी, जनावरांचे पालन करतात. या भागात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कौलारू घरं पाहायला मिळतात. या शेती तसेच घरबांधकाम, बांबुकाम, व्यवसायासंदर्भात अनेकविध पारंपरिक पद्धती जोपाासल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बांबूपासून टोपली, डालगं, कणगी, डाल, सुप बनविणे कलाकुसर असणाºया व्यक्तींनाच जमते. यासाठी मेहनत खूप घ्यावी लागते. परंतु खर्च नाही. शेतीकाम तसेच अन्नधान्याच्या साठ्यासाठी लागणाऱ्या वस्तू सहजपणे बनविल्या जात आहेत. शहरी भागात प्लास्टिक टब, ड्रमचा वापर होत असला तरी अद्यापही ग्रामीण भागात याचे प्रमाण तुरळक असून, बहुसंख्य प्रमाणात बांबू कामाच्याच वस्तूंना प्राधान्य दिले जात आहे.
वेळ मिळेल तसे बांबू कामापासून अनेक प्रकारच्या वस्तू बनविल्या जातात. या कामात मेहनत खूप घ्यावी लागते. परंतु खर्च वाचला जातो.
-बाबूराव आखाडे,
कुसुंबीमुरा ता. जावळी