थंड हवेचे महाबळेश्वरही तापू लागले.., यंदा उन्हाळ्याची तीव्रता लवकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 01:40 PM2023-02-27T13:40:10+5:302023-02-27T13:40:50+5:30

जिल्ह्यात यावर्षी कडाक्याची थंडी अनुभवता आली नाही

Even cold Mahabaleshwar started heating up, the intensity of summer is early this year | थंड हवेचे महाबळेश्वरही तापू लागले.., यंदा उन्हाळ्याची तीव्रता लवकर

संग्रहीत छाया

googlenewsNext

सातारा : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता वाढली असून थंड हवेचे महाबळेश्वरही तापू लागले आहे. महाबळेश्चरचे कमाल तापमान कायम ३१ अंशावर आहे. यामुळे आगामी काळात तीव्र उन्हाळ्याला सामोरे जावे लागण्याचे संकेत आहेत.

जिल्ह्यात यावर्षी कडाक्याची थंडी अनुभवता आली नाही. कारण, एकदाच सातारा शहराचा पारा १० अंशापर्यंत खाली आला होता. नाहीतर सतत तापमान १४ अंशावर राहिले. आता तर थंडीच गायब झाली आहे. पारा सतत १५ ते २० अंशादरम्यान राहत आहे. त्यातच कमाल तापमानात सतत वाढ होत चालली आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता अनुभवायास मिळत आहे. तर सातारा शहराचा पारा ३६ अंशावरही जात आहे. यामुळे सातारकरांनाही उन्हाच्या झळा आतापासून चांगल्याच जाणवत आहेत. त्यातच आता जागतिक पर्यटनस्थळ असणाऱ्या महाबळेश्वरचाही पारा वाढतोय. गेल्या आठ दिवसांत सतत कमाल तापमान ३१ अंशावर राहिले. यामुळे महाबळेश्वरही तापू लागल्याचे दिसून आहे.

पुढे मार्च, एप्रिल आणि मे हे महिने आहेत. या महिन्यात कडाक्याचा उन्हाळा असतो. त्यामुळे यंदा महाबळेश्वरचे तापमान ३५ अंशापर्यंत पोहाेचू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. तर गेल्यावर्षी महाबळेश्वरला २८ एप्रिल रोजी पारा ३३.०८ अंश नोंद झाला होता. हे उच्चांकी तापमान ठरले होते. यंदा लवकर ऊन पडू लागल्याने महाबळेश्वरचा पारा गतीने वाढून पारा ३५ अंशापर्यंत पोहाेचू शकतो, असा अंदाज आहे.

महाबळेश्वरचे कमाल तापमान असे :

दि. १५ फेब्रुवारी ३०.०५, १६ फेब्रुवारी २९.०१, १७ फेब्रुवारी २९.०८, दि. १८ फेब्रुवारी ३०.०९, १९ फेब्रुवारी २९.०६, २० फेब्रुवारी ३१.०६, २१ फेब्रुवारी ३२.०१, २२ फेब्रुवारी ३१.०६ दि. २३ फेब्रुवारी ३१.०६, २४ फेब्रुवारी ३१.०८, २५ फेब्रुवारी ३१.०४ आणि दि. २६ फेब्रुवारी ३१.०६

Web Title: Even cold Mahabaleshwar started heating up, the intensity of summer is early this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.