लाॅकडाऊन संपला तरी, मुलांना घराबाहेर सोडू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:38 AM2021-05-16T04:38:30+5:302021-05-16T04:38:30+5:30

सावधान रहा; तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा लहान मुलांना लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारीची तिसरी लाट राज्यात ...

Even if the lockdown is over, don’t leave the kids out of the house! | लाॅकडाऊन संपला तरी, मुलांना घराबाहेर सोडू नका !

लाॅकडाऊन संपला तरी, मुलांना घराबाहेर सोडू नका !

Next

सावधान रहा; तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा लहान मुलांना

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना महामारीची तिसरी लाट राज्यात येऊ पाहत आहे. दुसऱ्या लाटेने लोकांना सळो कि पळो करून सोडले. प्रशासनदेखील हतबल झाले. शासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. आता ही तिसरी लाट आली तर त्यामध्ये मुलेही मोठ्या प्रमाणावर बाधित होऊ शकतात, हे लक्षात घेऊन मुलांना घराबाहेर सोडू नका, असे आवाहन प्रशासन करते आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गेल्या मार्च महिन्यापासून जिल्ह्यामध्ये अक्षरश: थैमान घातले आहे. ७३ हजारांच्या वर बाधित दुसऱ्या लाटेत सापडले. यामध्ये १८ वर्षांखालील लहान मुले मोठ्या प्रमाणावर बाधित झाली. आता तिसऱ्या लाटेचा दहा वर्षांखालील मुलांना त्रास होणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते. तसेच लहान मुले एकमेकांच्या संपर्कात येत असतात, बाहेर खेळतात, मास्क न वापरता मित्रांमध्ये मिसळतात. यातून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन मुलांना बाहेर नाही पाठवले तर बरे. स्वतंत्र इमारत असेल तर त्या इमारतीतील मुलांसोबत मुले खेळली तरी काही प्रश्न येत नाही; पण बाहेर जाऊन रस्त्यावर खेळणे धोकादायक ठरणार आहे. लहान मुले बाधित झाल्यानंतर त्यांना तत्काळ डॉक्टरांना दाखविणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. तसेच सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असलेल्या मुलांना घरातील वयस्कर लोकांपासून दूर ठेवावे, असा सल्लादेखील तज्ज्ञ देत आहेत.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत :

कोरोनाचे १८ वर्षांखालील रुग्ण -१३३३१

दुसऱ्या लाटेतील रुग्ण - ७३,९७०

१० वर्षांपेक्षा कमी वयाचे रुग्ण - ६३१२

लहान मुलांमध्ये कोरोनाचे लक्षणे काय? (बॉक्स)

दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचे लक्षणे मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. लहान मुलांचे नाक वाहायला लागते. सर्दी मोठ्या प्रमाणावर होते.

मुलांना ताप येतो. अंगात सतत कणकण आणि अंग दुखतंय असे मुले वारंवार सांगतात. अशा मुलांना वेळीच डॉक्टरांकडे नेणे गरजेचे आहे.

मुलांना तीव्र स्वरूपाचा खोकला होतो. फुप्फुसावर ताण येत येत असल्याने मुले सतत रडत राहतात. मुलांपासून दुसऱ्याला मोठ्या प्रमाणावर संसर्ग होतो.

अंग गळून गेल्यासारखे मुले करतात. त्यांच्यात त्राणच राहत नाही. नेहमी उत्साहाने खेळणारी, बागडणारी मुले अचानकपणे झोपून राहण्याची इच्छा व्यक्त करतात. ताप थांबत नाही.

३) बालरुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय (बॉक्स)

अपेक्षित तिसरी लाट आणि लहान मुलांना धोका ओळखून प्रशासनाने सातारा शहरातील चिरायू हॉस्पिटल पूर्णपणे लहान मुलांसाठी उपलब्ध केलेले आहे. या व्यतिरिक्त जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा, उपजिल्हा रुग्णालय फलटण व उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड येथेदेखील लहान मुलांचे स्वतंत्र वाॅर्ड करण्यात आले आहेत. कृष्णा चॅरिटेबल या ठिकाणीदेखील लहान मुलांसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणावर बाधित होणार असल्याचे सांगितले जात असल्याने प्रशासनाने विशेष काळजी घेतलेली आहे. लहान मुलांना रस्त्यावर सोडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

४) लस येईपर्यंत काळजी घ्यायलाच हवी. (तीन बालरोगतज्ज्ञांच्या प्रतिक्रिया)

मुलांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असतील तर त्यांना तत्काळ विलगीकरणात ठेवावे. घरातील वयस्कर व्यक्तींची त्यांचा संपर्क येऊ न देणे याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे; अन्यथा त्यांच्या माध्यमातून वयस्कर व्यक्तींना तसेच घरातील कर्त्या लोकांना प्रादुर्भाव होऊ शकतो.

- डॉ. प्रशांत कापरे

मुलांना मोठ्या प्रमाणावर जुलाब होणे हेदेखील लक्षण कोरोनामध्ये दिसून येत आहे. जोपर्यंत बारा वर्षांखालील मुलांना लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत मुलांची काळजी घेणे हा त्यावरचा पर्याय आहे. मुलांना झालेला आजार अंगावर काढून देऊ नका. त्यांना लगेच डॉक्टरांना दाखवा.

- डॉ. भास्कर यादव

मुलांना गर्दीच्या ठिकाणी पाठवू नका. जिथे स्वच्छ हवा आहे, मोकळे वातावरण आहे त्या ठिकाणी मुले खेळली तरी चालू शकेल; परंतु जिथे लोकांचा संपर्क येतो तिथे मास्क आवश्यक आहे. घरातील व्यक्तींना जर सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असतील तर त्यांनी मुलांशी संपर्कात येणे टाळावे.

- डॉ. महेश हावळ

Web Title: Even if the lockdown is over, don’t leave the kids out of the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.