चिंता मिटली, राज्य बदलले तरी वाहन नंबर राहणार तोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 05:00 PM2021-12-29T17:00:25+5:302021-12-29T17:01:01+5:30
राज्य बदलले तरी आता वाहनांचे नंबर बदलावे लागणार नाहीत.
सातारा : राज्य बदलले तरी आता वाहनांचे नंबर बदलावे लागणार नाहीत. यासाठी वाहन नोंदणीची बीएच सिरीज सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात ही सिरीज काही दिवसांतच सुरू होणार आहे.
वाहनांचे राज्यादरम्यान स्थलांतर सुलभतेने व्हावे यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार वाहनांच्या नोंदणी करता भारत मालिका बीएच सिरीज ही नवीन नोंदणी मालिका सुरू केली आहे. याचा सर्वाधिक फायदा हा केंद्रीय कर्मचारी तसेच राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच ज्या व्यक्तींची सातत्याने परराज्यात बदली होते, अशा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी देखील ही सिरीज महत्त्वपूर्ण आहे.
असे असणार नंबर्स...
नवीन सिरियलची सुरुवात बीएच या अक्षराने सुरू होईल. त्या आधी रजिस्ट्रेशन वर्षे असेल म्हणजेच २०२१ मधील २१ अंक तिथे असेल बीएच्या भारत सिरीज कोड असेल त्यानंतर चार अंकी क्रमांक असेल शेवट राज्याचे शब्द असतील.
बीएच सिरीजसाठी अर्ज कसा करावा...
-तुम्हाला जर बीएच सिरीज हवी असल्यास त्यासाठी सर्वांत महत्त्वाची अट आहे. ती म्हणजे तुम्ही दोन वर्षांचा रोड टॅक्स भरलेला असावा.
-जर तुम्ही दोन वर्षांचा रोड टॅक्स भरलेला असेल तर तुम्हीही बीएच सिरीज घेऊ शकता. त्यासाठी परिवहन मंत्रालयाच्या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल.
-आपण वाहन डीलरच्या मदतीने देखील नोंदणी करू शकतो. नोंदणी करताना विचारण्यात आलेले सर्व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
दोन वर्षांपर्यंत रोड टॅक्स भरता येणार...
बीएच सिरीजसाठी दर दोन वर्षांनी रोड टॅक्स भरावा लागणार आहे. आता वाहनाची नोंदणी डीलरकडे होते. त्यामुळे त्यांच्याकडेच हा टॅक्स भरावा लागतो. नोंदणी झाल्याशिवाय वाहन रस्त्यावर येऊ शकत नाही.
बीएच सिरीज महाराष्ट्रात सुरू झाली आहे. बीएच सिरीजचे वाहन संपूर्ण देशात जाऊ शकते. मात्र, त्यासाठी संबंधित संस्था कंपनी यांचे दोन राज्यांमध्ये किमान चार कार्यालय किंवा स्थापना असणे आवश्यक आहे. - विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा