लॉकडाऊनमध्येही ‘मनरेगा’ने दिला हजारो हातांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:39 AM2021-02-11T04:39:59+5:302021-02-11T04:39:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘मागेल त्याला काम’ हे ब्रीद तंतोतंत खरे ठरवत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘मागेल त्याला काम’ हे ब्रीद तंतोतंत खरे ठरवत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात लॉकडाऊनच्या पडत्या काळातही सरासरी सात ते आठ हजार ग्रामीण लोकांना रोजगार देऊन शासनाच्या या विभागाने दिलासा दिला. लॉकडाऊनच्या सहा महिन्यांच्या काळात व्यवहार बंद झाले. कामे ठप्प होऊन चलन-वलन थांबले असताना मनरेगा अंतर्गत शासन वैयक्तिक स्वरूपाच्या कामांना प्राधान्य देत अवघ्या दोन आठवड्यांत अकुशल हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यशस्वी ठरले.
कोरोना महामारीने देशातील नागरिकांच्या आरोग्याबरोबरच अर्थकारणावर ही मोठा घाव घातला. यामध्ये लाखो लोक बेरोजगार झाले. काहींचे रोजगार हिसकावले गेले, चलन-वलन थांबल्याने उपासमारीची वेळ अनेकांवर आली. अशा पडत्या काळात, एप्रिलच्या प्रारंभास केंद्र शासनाने मनरेगाची कामे वैयक्तिक स्वरूपात सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना दिलासा मिळाला. सातारा जिल्ह्यात जानेवारी - फेब्रुवारी २०२० या महिन्यात रोजगार हमीवर १४ ते १७ हजार मजूर काम करत होते. मार्चमध्ये लॉकडाऊन झालं आणि कामगारांची संख्या घटून अवघ्या दोन हजारांवर आली. या काळात पंधरा दिवस सर्व कामे ठप्प होती.
मनरेगाची कामे पुन्हा सुरू केल्यानंतर एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत ३ ते ८ हजार ५०० पर्यंत मजुरांची संख्या वाढत गेली. गेल्या दहा महिन्यांत रोजगार हमी योजनेंतर्गत निव्वळ मजुरांच्या पगारावर सातारा जिल्ह्यात तब्बल दहा कोटींहून अधिक रक्कम खर्ची पडल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील उपलब्ध आकडे सांगतात. डिसेंबर २०२० अखेर १२ हजार ४८ मजूर रोजगार हमी योजनेवर काम करत आहेत. मनरेगाने ग्रामीण भागातील जनतेला रोजगाराची हमी देऊन त्यांच्या भाजी-भाकरीचा प्रश्न मार्गी लावत दिलासा दिला आहे. एक हजार ८४ हेक्टरवर फळबाग लागवड व १४४ हेक्टरवर रेशीम शेती करण्यात आली. महाराष्ट्राची योजना केंद्राने स्वीकारली
मनरेगा कशासाठी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलसंधारण व जलसंवर्धन,दुष्काळ प्रतिबंधक कामे, कालवे, फळझाड व भूसुधार, ग्रामीण भागात बारमाही जोडरस्ते, पूरनियंत्रण, पूरसंरक्षण आदी प्रकारची कामर केली जातात. हे करताना ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना रोजगार देणे आणि त्यातून दीर्घकालीन टिकणारी कामे व त्याद्वारे सामाजिक पायाभूत सोयी उपलब्ध करून देणे हा शासनाचा उद्देश साध्य केला जातो.
कोट :
महिलांच्या हाताला काम नव्हतं म्हणून ग्रामपंचायतीच्या पडीक जागेवर बिहार पॅटर्नमधून आम्ही वृक्ष लागवड केली. 'मनरेगा''तून १२ महिलांना याठिकाणी रोजगार दिला. लॉकडाऊनकाळात लोकांच्या हाताला काम नव्हते. पण या ठिकाणी काम करणाऱ्यांना काही दिवसांचा अपवाद वगळता लॉकडाऊनमध्येही आम्हीं रोजगार देऊ शकलो’.
- संध्या माने, ग्रामसेविका किरपे, कऱ्हाड
‘मनरेगा’च्या माध्यमातून ग्रामीण जनतेला रोजगाराची हमी देऊन कष्टकऱ्यांना दिलासा दिला आहे. एक हजार ८४ हेक्टरवर फळबाग लागवड व १४४ हेक्टरवर रेशीम शेती करण्यात आली. शोषखड्डे, वैयक्तिक घरकुलांची कामेही या काळात करण्यात आली.
- किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी मनरेगा