उरी हल्ल्यात शहीद झालेल्या चंद्रकांत गलांडेंच्या जाशी गावावरही शोककळा
By Admin | Published: September 19, 2016 10:15 AM2016-09-19T10:15:36+5:302016-09-19T10:53:52+5:30
माण तालुक्यातील जाशी गावचे सुपुत्र अन लष्करातील लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे काश्मीर खोऱ्यात शहीद झाल्याची बातमी कळताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली
>ऑनलाइन लोकमत
पळशी ( सातारा ), दि. १९ - माण तालुक्यातील जाशी गावचे सुपुत्र अन लष्करातील लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे काश्मीर खोऱ्यात शहीद झाल्याची बातमी कळताच संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
उरीमध्ये रविवारी भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात सतरा जवान शहीद झाले. त्यात महाराष्ट्राचे तीन जवान असल्याची माहिती रात्री उशीरा समजली. माण तालुक्यातील जाशी येथील चंद्रकांत शंकर गलांडे हेही शहीद झाल्याची बातमी गावात पोहोचली, तेव्हा साऱ्यांचीच पावले त्यांच्या घराकडे वळाली.
शहीद चंद्रकांत यांचे इतर दोन भाऊ मंज्या बापू अन केशव हेही लष्करातच सेवेला आहेत. गावालगतच्या शेतात त्यांची स्वतंत्र वस्ती असून तिथे पत्नी अन दोन मुलांसह कुटुंब राहते. माण तालुक्यातील अधिकारी अन पदाधिकारी गावात पोहोचले असून पार्थिव पुण्याहून तालुक्यात आणले जाणार आहे.