पाडव्या दिनीही अजिंक्यतारा पेटला! अनेकांचा गैरसमज आग लावून जातो...
By प्रगती पाटील | Published: April 9, 2024 08:10 PM2024-04-09T20:10:56+5:302024-04-09T20:11:13+5:30
अजिंक्यताऱ्यासह यवतेश्वर, महादरे आणि भैरोबाचा पायथा या डोंगरांनी सातारा शहराला वेढले आहे. या परिसरात आढळणारी जैवविविधताही खास अशीच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मराठी नवीन वर्ष म्हणून एकीकडे शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा समाजकंटकांनी अजिंक्यतारा पेटवला. सायंकाळी चारच्या सुमारास अजिंक्यतारा डोंगराच्या पुर्वेस वणवा लागला आणि काही तासांतच तो वाढत दुसऱ्या टोकापर्यंत गेला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
अजिंक्यताऱ्यासह यवतेश्वर, महादरे आणि भैरोबाचा पायथा या डोंगरांनी सातारा शहराला वेढले आहे. या परिसरात आढळणारी जैवविविधताही खास अशीच आहे. पण अंधश्रध्देतून डोंगरला आग लावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. डोंगर जाळले तर जनावरांसाठी उत्तम प्रतीचे गवत पुढच्या वर्षी येते असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे दिवाळीनंतर जरा उन पडू लागले की लोकं डोंगरात येऊन गवत कापून नेतात. आपल्या जनावरांसाठी पुरेशा गवताची तजवीज झाली की उर्वरित डोंगर जाळून टाकण्याची पध्दत गेल्या अनेक वर्षांपासून रूढ झाली आहे. याबाबत वनविभागाच्यावतीने वारंवार प्रबोधन करूनही नागरिकांची मानसिकता बदलत नाही.
शहराच्या लगत असलेल्या डोंगरांमध्ये मात्र केवळ गंमतीचा भाग म्हणून वणवा लावला जातो. सहज फिरायला गेलेल्या युवांच्या टोळक्याकडून गंमत म्हणून गवत पेटवले जाते. काही जणांना रात्रीच्यावेळी हा नजारा पहायला आवडत असल्याचेही ते खासगीत सांगतात. युवांच्या या गंमतीचा दुरगामी परिणाम पर्यावरण आणि इथल्या जैवविविधतेवर होत असल्याने इथली जैव साखळीही अडचणीत येणयाची शक्यता वर्तवली जात आहे.
१. जनावरे तरी आहेत का?
ग्रामीण भागात वणवा लावणाऱ्यांकडे चाैकशी केली की ते सर्रास जनावरांच्या चांगल्या चाऱ्यासाठी वणवा लावला असल्याचे नमुद करतात. गायी म्हशींसह बैलांसाठी वर्षभराचा चारा डोंगरावरूनच आणावा लागतो. त्यामुळे चांगल्या दर्जाचा चारा पाहिजे असेल तर डोंगर पेटवले पाहिजेत अशी सबब दिली जाते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातूनही पशुधन लुप्त होऊ लागले आहे. ज्यांच्यासाठी डोंगर जाळला जातोय त्या पशुधनाची संख्या गावाकडेही रोडावली आहे. त्यामुळे डोंगरावर सध्या अस्तित्वात असलेले गवतही त्यांना पुरून उरतेय, अशी परिस्थिती आहे.
वणवा लावल्याने गवताबरोबरच अनेक छोटे जीव, किडे मुंग्या, पक्षी, त्यांची अंडी आणि सरपटणारे प्राणी जिवानीशी जातात. आग लागल्यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही कमी होते. परिणामी डोंगर निसटणे, पाणी पूर्ण वाहून येणे हे धोके निर्माण होतात. यातून मातीचे होणारे नुकसान कधीही न भरून येणारे असे आहे.
- सुनिल भोइटे, मानद वन्यजीव रक्षक