साताऱ्यातील निम्मे कारखाने अद्याप बंद; गळीत हंगाम रडतखडतच !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 05:11 PM2022-11-09T17:11:20+5:302022-11-09T17:11:38+5:30
बहुतांशी कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत.
नितीन काळेल
सातारा : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी सातारा जिल्ह्यात मात्र, रडतखडतच प्रवास आहे. अजूनही निम्मे कारखाने बंद आहेत, तर काही कारखान्यांनी आणखी गाळप परवानाच घेतलेला नाही. त्यातच शेतकरी संघटनांच्या मागण्या मान्य न झाल्याने आंदोलनाची धार वाढू शकते. त्यामुळे गाळप हंगाम कधी पूर्ण क्षमतेने सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. पूर्वी पश्चिम भागात ऊसक्षेत्र अधिक होते. पण, मागील काही वर्षांत माण, खटाव तालुक्यातही पाण्याची उपलब्धता झाल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यातच साखर कारखान्यांची संख्याही वाढली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात खासगी आणि सहकारी मिळून १६ कारखाने आहेत. गेल्यावर्षी मे-जूनपर्यंत काही कारखान्यांचे गाळप सुरू होते. यंदा आतापर्यंत ७ ते ८ कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली आहे.
पुणे येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना, रयत -अथनी सहकारी साखर कारखाना, स्वराज इंडिया ॲग्रो, श्री दत्त इंडिया, शरयू ॲग्रो, श्रीराम जवाहर, जयवंत शुगर्स, ग्रीन पॉवर शुगर्स, खंडाळा तालुका शेतकरी सहकारी, खटाव-माण तालुका ॲग्रो प्रोसेसिंग, जरंडेश्वर या कारखान्यांनी गाळप परवाना घेतला आहे. तर किसन वीर, अजिंक्यतारा, सह्याद्री, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यांनी अद्याप परवाना घेतलेला नाही. जावळी तालुक्यातील प्रतापगड कारखान्याचा हंगाम बंद आहे. अशा स्थितीत सध्या निम्मेच कारखाने सुरू आहेत. त्यातच शेतकरी संघटना दर आणि थकबाकीसाठी आक्रमक झाल्या आहेत. यामुळे कारखाने पूर्ण क्षमतेने कधी गाळप करणार, हा प्रश्न आहे.
जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेने यावर्षी तुकडे-तुकडे न करता एकरकमी एफआरपी द्यावी, मागील थकबाकी आणि नफ्यातील २०० रुपये मिळावेत, अशी मागणी केली आहे. त्यातच बहुतांशी कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत.
रयत- अथनी कारखान्यानेच दर जाहीर केला आहे. असे असले तरी अनेक कारखान्यांनी दर जाहीर न करता गाळप सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आंदोलन करण्यावर ठाम आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात मोर्चा काढला होता. साखर आयुक्तांसमोर अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. याबाबत तोडगा न निघाल्यास आंदोलनाची धार वाढवू, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे कारखान्यांनी मागील थकबाकी आणि यावर्षीचा दर जाहीर न केल्यास आंदोलनाची धग वाढणार हे निश्चित आहे.
जिल्ह्यातील साखर कारखाने मागचे पैसे आणि नवीन दर जाहीर करत नाहीत, तोपर्यंत कोणीही तोड करू नये. तसेच उसाची वाहतूक आणि कारखानेही सुरू करू नयेत. जे कारखाने सुरू आहेत, त्याबाबत साखर आयुक्तांच्या कानावर गोष्टी घातल्या आहेत. आता सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची गरज आहे. कारखानदारांना गुडघे टेकायला लावून दर घेतल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आंदोलनाची धार आणखी वाढवणार आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना