संकटातही ‘आरोग्य’ची घडी विस्कटलेलीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:42 AM2021-05-06T04:42:11+5:302021-05-06T04:42:11+5:30
सातारा : कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना सातारा पालिका हिमतीने करत असली तरी, आरोग्य विभागाची घडी मात्र अजूनही विस्कटलेलीच आहे. ...
सातारा : कोरोनासारख्या महाभयंकर संकटाचा सामना सातारा पालिका हिमतीने करत असली तरी, आरोग्य विभागाची घडी मात्र अजूनही विस्कटलेलीच आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर या विभागाचा गाडा हाकला जात असून, आरोग्याची परिपूर्ण माहिती असलेला एकही सक्षम अधिकारी या विभागात नाही. त्यामुळे संकटकाळात सातारकरांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.
पालिकेतील आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, नियोजन, वसुली, आस्थापना आदी विभागांमध्ये सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणून आरोग्य विभागाकडे पाहिले जाते. शहर स्वच्छतेची जबाबदारी असल्याने या विभागाकडे कायमच सर्वांचे लक्ष असते. आता तर हद्दवाढीमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा ताण पूर्वीपेक्षा दुपटीने वाढला आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सुमारे अडीच लाख लोकांचा भार आरोग्य विभागाला पेलावा लागत आहे.
आरोग्य हा महत्त्वाचा विषय असताना या विभागातील अधिकाऱ्यांची कमतरता वर्षभरापासून चर्चेचा विषय ठरला आहे. गतवर्षी पालिकेत घडलेल्या लाचखोरीच्या प्रकरणानंतर चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर आरोग्य विभागाची गाडी कधी गतीने चाललीच नाही. ज्या अधिकाऱ्यांना ‘आरोग्या’चा अनुभव नाही, अशांवर या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने सातारकरांचे ‘आरोग्य’ अबाधित राखण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु आता कोरोनामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे.
गतवर्षी आरोग्य विभागाने कोरोना काळात अत्यंत जबाबदारीने काम केले. आता संकट गंभीर असताना उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत. कोरोना प्रतिबंधासह साथरोग, पावसाळ्यापूर्वी केली जाणारी ओढे, नाले स्वच्छता मोहीम, निर्जंतुकीकरण मोहीम, धूर फवारणी अशा अनेक बाबींचा यंदा प्रशासनाला विसर पडल्याचे दिसते. आरोग्याची पुरेपूर माहिती असणारा अधिकारी या विभागात नसल्याने अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. इतकेच काय, स्वच्छ सर्वेक्षण अभियान तसेच शासनाच्या इतर उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागत आहे. एकूणच आरोग्याची गाडी रुळावर नसल्याने सातारकरांचे स्वास्थ्य मात्र बिघडत चालले आहे.
(चौकट)
कुणाच्या खांद्यावर... कुणाचे ओझे...
आरोग्य विभागाची अवस्था सध्या ‘कुणाच्या खांद्यावर... कुणाचे ओझे...’ अशी बनली आहे. ही परिस्थिती बदलणे आता गरजेचे आहे. ज्या अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे, त्यांना निलंबन काळातही शासनाकडून वेतन दिले जाते. त्या अधिकाऱ्यांचा व त्यांच्या अनुभवाचा प्रशासनाने कुठे तरी उपयोग करून घ्यायला हवा. सध्या कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. स्वच्छतेपासून ते अंत्यसंस्कार करण्यापर्यंत पालिकेची आरोग्य यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांवर अशा कामांची जबाबदारी सोपवली तरी, अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. याबाबतही प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा.
लोगो : सातारा पालिकेचा फोटो