अखेर साईडपट्ट्यांवर पडला मुरुम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:40 AM2021-02-11T04:40:44+5:302021-02-11T04:40:44+5:30
खंडाळा ते लोणंद रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या भरण्यासाठी ठेकेदारांनी मुरुमाचे ढीग जागोजागी टाकले ...
खंडाळा ते लोणंद रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या भरण्यासाठी ठेकेदारांनी मुरुमाचे ढीग जागोजागी टाकले आहेत. तसेच ढीग बाजूला होते यातील काही मुरूम रस्त्यावरही पडला होता. त्यामुळे दुचाकी वाहने घसरून छोटे-मोठे अपघात होत होते तसेच या रस्त्यालगत असणाऱ्या ग्रामस्थांना शेतात आणि विविध कामांना जाण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नव्हती. रस्त्यावरून भरधाव वेगाने धावणारी वाहने जात असल्याने जीविताला धोका वाढला होता. त्यातच तालुक्यात रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या तीन पादचाऱ्यांना एका वाहनाने ठोकरल्याने त्यांना नाहक प्राण गमवावे लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यातच आता शाळा सुरू झाल्याने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूचा मुरुम पसरून रस्ता सुरक्षित करावा अशी जनतेची मागणी लोकमतने उचलून धरली होती . त्याची दखल घेऊन बांधकाम विभागाने ठेकेदाराला तातडीने हे काम करण्यास भाग पाडले.
खंडाळा-लोणंद रस्त्याच्या बाजूने मुरुमाचे पडलेले ढीग पसरले नसल्याने अपघातांची मालिका सुरु होती. याबाबत कार्यवाही तातडीने करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. लोकमतच्या माध्यमातून ही व्यथा मांडल्याने ही मागणी सुरू झाले याबाबत समाधान वाटते.
महेश राऊत , ग्रामस्थ म्हावशी