अखेर ‘तहसील’ परिसर झाला स्वच्छ !
By admin | Published: November 20, 2014 09:54 PM2014-11-20T21:54:01+5:302014-11-21T00:27:51+5:30
विद्यार्थ्यांचा पुढाकार : कर्मचाऱ्यांनी घेतला मोकळा श्वास--लोकमतचादणका
वडूज : घाणीची दुर्गंधी व मोठेले डास यामुळे तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांच्या व येथील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. या संदर्भात ‘लोकमत’ने गुरुवारी (दि. १३) ‘तहसीलमध्येच डेंग्यूला आमंत्रण’ या असे वृत्त प्रसिद्ध केली होती. त्याचाच परिणाम तहसील कार्यालयाचा परिसर स्वच्छ झाला आणि येथील कर्मचाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला.
या परिसरातील स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी नसल्याने हा परिसर वारंवार अस्वच्छ असतो. राज्यात डेंग्यूसदृश परिस्थितीत निर्माण झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांच्या दालनात यासंदर्भात १५ दिवसांपूर्वी जनजागृती बैठक पार पाडली. परंतु, याच दालनाच्या मागील बाजूस घाणीचे साम्राज्य साठून डासांचे प्रमाण वाढले होते. याचाच परिणाम येथील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत होता. दुर्गंधीपासून आणि डासांपासून संरक्षणासाठी दिवसा पंखे व डास निर्मूलन अगरबत्ती लावून येथील कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतात. याचाच फटका दस्तूरखुद्द तहसीलदार विवेक साळुंखे यांनाच बसला. पाच दिवसांपूर्वी तेच स्वत: तापाने आजारी होते. सलग चार दिवस रजेवर जाऊन त्यांनी विश्रांती घेतली. त्यानंतर ते पुनश्च हजर झाल्यानंतर सर्वप्रथम तहसील परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.
तहसील कार्यालय परिसरात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व शौचालय दुरुस्ती तातडीने करणार असल्याचे तहसीलदार विवेक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. (प्रतिनिधी)
खराट्यांचा खडखडाट...
सध्या स्वच्छता मोहीम वडूज परिसरात सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून खराटे विकत आणले आणि त्याचा वापर झाल्यानंतर शाळेस भेट दिले. त्यामुळे वडूज बाजारपेठेतील सर्व दुकानातील खराटे संपल्याने बाजारपेठेत खराट्यांचा खडखडाट जाणवू लागला आहे.
ही ‘स्वच्छता मोहीम’ राबविताना छत्रपती शिवाजी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. या स्वच्छतेच्या कामी लागणारे खराटे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून आणून स्वच्छता केल्याने बाजारपेठेतेत गर्दी झाली होती.