प्रत्येक घरात स्वावलंबी कुटुंब संकल्पना रुजणे गरजेचे

By admin | Published: July 9, 2015 10:52 PM2015-07-09T22:52:36+5:302015-07-09T22:52:36+5:30

कामाचे विभाजन आवश्यकच : कुटुंबीयांनी घ्यावा सक्रिय सहभाग; ज्येष्ठांची जबाबदारी महत्त्वाची

Every home should have a concept of self-supporting family | प्रत्येक घरात स्वावलंबी कुटुंब संकल्पना रुजणे गरजेचे

प्रत्येक घरात स्वावलंबी कुटुंब संकल्पना रुजणे गरजेचे

Next

प्रगती जाधव-पाटील -सातारा  : माझ्याशिवाय घराचं पान हालत नाही, हे अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाही. याचा दुसरा अर्थ कुटुंबीयांना स्वावलंबी बनविण्यात अयशस्वी झाल्याचे भान महिलांनी ठेवले पाहिजे. ‘सुपर वुमन सिंड्रोम’ पासून दूर यायचं असेल तर ‘स्वावलंबी कुटुंब’ ही संकल्पना सत्यात उतरविणे आवश्यक आहे.
घरातील पुरूषांनी किंवा मुलांनी महिलांच्या चौकटीतील कोणतेही काम केले की ते समाजाच्या दृष्टीने वर्ज्य असते. मित्र-मैत्रिणी कोणाच्याही आल्या तरी त्यांना काय हवे नको ते पाहणे हे काम केवळ स्त्रियांचेच असते, असा समज दृढ आहे. जोपर्यंत महिलांना मनुष्य म्हणून स्थान मिळणार नाही, तोपर्यंत त्यांच्यातील हा आजार हद्दपार होणार नाही.
पती-पत्नी यांच्या सहचर्याने संसार सुरू होतो. निसर्गाने स्त्री-पुरूषाची निर्मिती करताना काही फरक केला नाही. पण लहान वयातच ‘मुलीसारखं रडायचं नाही’ ही शिकवण मुलांना मिळत असल्यामुळे रडण्याचं काम मुलींचेच असते, अशी मुलांची समजूत होते. अशाच गोष्टी मग पुढे आचरणात आल्यामुळे महिला आणि मुलींवर घरातील कामांची जबाबदारी पडते व मुलांना या कामांपासून दूर ठेवले जाते.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मुलं, पती आणि घरातील ज्येष्ठांना जमेल ती कामे विभागून द्या. दुसरी, तिसरीतील मुलांना स्वत:चे स्वत: आवरायला सांगा. पतीलाही सगळ्या गोष्टी हातात देण्यापेक्षा वस्तू ठेवण्याची ठिकाणे दाखवून ठेवा. चहा आणि नाष्टा यांची जबाबदारी
घरातील ज्येष्ठांना द्या. अशा जबाबदारी वाटण्यामुळे प्रत्येकजण स्वावलंबी होईल आणि कामाचा अतिरिक्त ताण कोणा एकावर पडणार नाही. कुटुंबीयांनीही एखाद्या दिवशी मिळून गृहिणीला सक्तीने विश्रांती घेऊ द्यावी. घरातील स्त्री जोपर्यंत अंथरूणाला खिळत नाही, तोपर्यंत तिच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. सौजन्याने सर्व कामे स्वत:च्या खांद्यावर घेणाऱ्या महिलांनाही कधीतरी ‘ब्रेक’ हवा असतो याची जाणीव प्रत्येकानेच ठेवावी.


आठवड्यातून तीन तास फक्त स्वत:साठीच!
घर आणि नोकरी यांच्यात अडकलेल्या महिलांना आठवड्याची सुट्टीही मिळत नाही. त्यांच्या सुट्टीच्या दिवशी हमखास येणारे पाहुणे हे सुट्टीच्या आनंदावर विरजन टाकणारेच असतात. गृहिणी आणि नोकरदार महिलांनी आठवड्यातून किमान तीन तास तरी मनस्वी जगण्याचा आनंद घ्यावा. व्यक्ती म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या झुगारून देऊन मनाला समाधान होईल असे काही तरी करावे. यात त्यांनी कोणताही अपराधीपणाचा भाव ठेवू नये.
बालवयातच भेदभावाला सुरुवात
नवजात अर्भकाला कापडात गुंडाळून ठेवले तर मुलगा का मुलगी हे कोणीच सांगू शकत नाही. पण जसे ते मोठे होतात, तसे त्यांच्या पेहरावावरून त्यांच्यात फरक करायला सुरूवात होते. गुलाबी, पिवळा हे रंग मुलींचे होतात, तर काळा आणि लाल रंगांवर मुलांची मक्तेदारी येते. मुलींसाठी फ्रॉक आणि मुलांना पॅन्ट शर्ट हे अघोषितच होते. खेळण्यांच्या दुकानातही मुलींसाठी भातुकली आणि मुलांसाठी जेसीबी हा फरक पहायला मिळतो. चुकून एखादा मुलगा भातुकली खेळू लागला तर त्याच्यात काहीतरी दोष आहे, असा शिक्का मारून समाज रिकामा होतो. स्त्री-पुरूष भेदभाव बालवयात या पध्दतीने रूजविणे चुकीचे आहे.

स्त्री-पुरूष समानतेचे कितीही गोडवे गायले तरीही पुरूषसत्ताक व्यवस्थेचे बळी महिला ठरणार आहेत. आपण कोणाकडे जेवायला गेलो तर महिलांनी ताट उचलून ठेवणे रूटीन आहे. पण एखाद्याने पुरूषाने ताट उचलून ठेवले तर हाहाकार माजतो.
ए. ल. शारदा, पॉप्युलेशन फर्स्ट संस्था

Web Title: Every home should have a concept of self-supporting family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.