प्रत्येक आमदार आपल्याच विचाराचा हवा

By admin | Published: September 7, 2014 10:10 PM2014-09-07T22:10:37+5:302014-09-07T23:24:54+5:30

अजित पवार : सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना म्हणे ‘कामाला लागा’

Every MLA has to think for himself | प्रत्येक आमदार आपल्याच विचाराचा हवा

प्रत्येक आमदार आपल्याच विचाराचा हवा

Next

कऱ्हाड/मसूर : ‘सातारा जिल्हा हा नेहमीच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे़ कसलंही वारं आलं तरी ते थोपवून धरा. जिल्ह्यातील प्रत्येक आमदार आपल्याच विचाराचा असला पाहिजे़ माण-खटावही त्याला अपवाद नाही,’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचार संहितेपूर्वीच जिल्ह्यात आज प्रचाराचा जणू नारळच फोडला अन् कार्यकर्त्यांना संकेतही दिले़
हणबरवाडी, ता़ कऱ्हाड येथे आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते़ पालकमंत्री शशिकांत शिंदे अध्यक्षस्थानी होते़ जिल्हाध्यक्ष सूनिल माने, आमदार मकरंद पाटील, आमदार प्रभाकर घार्गे, आमदार बाळासाहेब पाटील, कऱ्हाड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, बाजार समितीचे सभापती दाजी पवार, नगराध्यक्षा अ‍ॅड़ विद्या साळुंखे, जितेंद्र पवार, प्रशांत यादव आदिंची प्रमुख उपस्थिती होती़ उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आज केंद्र सरकारची शेती विषयक धोरणं ठीक नाहीत. राज्यातील साखर उद्योगाचे वेगळे प्रश्न आहेत़ पहिलीच १० लाख टन साखर कारखान्याकडे शिल्लक आहे़ नवा गळीत हंगाम लवकरच सुरू होईल़ ती तयार होणारी साखर कोठे ठेवायची हाही प्रश्न आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेणारे आपले सरकारच सत्तेवर असणे गरजेचे आहे़ मंत्री शिंदे म्हणाले, पाण्याची पळवापळवी वाढली आहे़ काहीजण तर दुष्काळाचं नाव पुढं करीत पाणी पळवत आहेत; पण जिल्ह्यातील पाणी जिल्ह्यालाच प्रथम मिळाले पहिजे, यासाठी आग्रही आहोत़
निवडणुका आल्या की अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधतात़ त्या साऱ्यांचा मंत्री शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला़ जिल्ह्यात उरमोडी सारख्या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभास त्या खात्याच्या मंत्र्यालाच बोलविले जात नाही, याबद्दल जाहिर नाराजीही त्यांनी व्यक्त केली़ कार्यक्रमास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ मानसिंगराव जगदाळे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)

‘च’ ची भाषा समजली का ? - शिंदे
हणबरवाडी येथील कार्यक्रम संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार एका ठिकाणी ‘प्रितीभोजनासाठी’ थांबले होते़ त्यावेळी बाहेर उभे असणारे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी आमदार मकरंद पाटील, आमदार प्रभाकर घार्गे यांच्याशी चर्चा करताना दादांची ‘च’ ची भाषा समजली का ? असे विचारत ‘आता सारेच आमदार आपल्याच विचाराचे निवडून आण्यासाठी कामाला लागा’ असेही त्यांनी हसत हसत त्या दोघांना सांगितले़
चौघांची उमेदवारी केली जाहीर
‘मी काही ज्योतिषी नाही; पण अंदाजे सांगतो,’ असे सांगत अजित पवार म्हणाले, ‘दोन दिवसात राज्यात आचारसंहिता लागेल़’ मग व्यासपीठावरील मंत्री शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, यांच्याकडे बघत ‘तुमच्या उमेदवारी तुम्हालाच मिळतील,’ असे सांगितले.यावर उपस्थितांमध्ये खसखस पिकली. ‘अन हो...सातारच्या राजांनाही सोडून चालणार नाही़,’ असं सांगत त्यांनी चौघांचीही उमेदवारी इथेच घोषित करून टाकली.
सभापती पद आता सव्वा वर्ष करा...
विधानसभेची रणधुमाळी असतानाच पंचायत समिती, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडी येवून ठेपल्या आहेत़ जिल्ह्यात यासाठी अनेक जण इच्छुक आहेत़ त्यामुळे साऱ्यांचं समाधान करण्यासाठी ही पदं सव्वासव्वा वर्षांसाठी वाटून द्या, म्हणजे एखादा नाराज झाला तर त्याला सांगता येतंय की,‘ तुला पुन्हा संधी आहे़ पण नुसतं ‘गाजरं’ दाखवू नका,’ असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यासपीठावरील नेत्यांना दिला़

राष्ट्रवादी १४४ जागांवर ठाम - पवार
‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपाची चर्चा आजही सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही १४४ जागांवर ठाम आहे. मंगळवारपर्यंत याबाबतचा निर्णय निश्चित होईल. शिवाय येत्या दोन दिवसात राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असून आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभेच्या निवडणुका शक्य आहेत,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र, यावेळी त्यांनी अन्य विषयांवर बोलण्याचे टाळले.

घड्याळ कुठे दिसेना !
कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘वैभव उत्तरचे’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले; पण त्यांनी पुस्तक पाहिल्यानंतर ‘यावर राष्ट्रवादीचं घड्याळ कुठं दिसत नाही?’ असा चिमटा आवर्जून काढला़ ‘ पण असो, पवार साहेबांचा फोटो तरी दिसतोय,’ असे म्हणत त्यांनी समाधानही व्यक्त केले; पण याची चर्चा कार्यकर्त्यांच्यात सुरू होती़

Web Title: Every MLA has to think for himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.