काम करणारी प्रत्येक महिला लक्ष्य!
By admin | Published: July 8, 2015 11:33 PM2015-07-08T23:33:50+5:302015-07-08T23:33:50+5:30
कामाची विभागणी आवश्यक : नोकरी करणाऱ्यांबरोबरच वीट कामगार, गृहिणींचाही समावेश--सातारी महिलेची व्यथा : दोन
प्रगती जाधव-पाटील - सातारा -घराबाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी आणि श्रमाचे काम करणाऱ्या महिलांना पगार मिळतो; पण ‘चोवीस तास आॅन ड्यूटी’ असणाऱ्या गृहिणींमध्ये या आजाराची लक्षणे सर्वाधिक दिसत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
सातारा शहरात नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण साधारण वीस ते पंचवीस टक्के आहे. काही जणी घरगुती कामे करतात. तर कोणी रोजगाराच्या कामावर व्यस्त असते. या सर्वांमध्ये घराबाहेर न पडणारी आणि दुपारची वामकुक्षी घेणारी गृहिणी सर्वांच्या डोळ्याला सलते. वास्तविक पाहता गृहिणीलाच सर्वाधिक मानसिक ताणाला समोरे जावे लागते. नोकरी आणि कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडून बाहेरील वातावरणात ताण विरण्याची संधी गृहिणींना मिळतच नाही. त्यामुळे घरच्या चार भिंतींनाच विश्व मानून त्या राहतात. सगळ्यांचे करता करता आणि आवरता आवरता त्यांचे स्वत:कडे अक्षम्य दुर्लक्ष होते.
गृहिणींमध्ये मोठ्या प्रमाणावर मानसिक कोंडमारा दिसतो. उंबरठा न ओलांडू देणं हे एकीकडे घरंदाज मानले जाते तर दुसरीकडे ‘तू कमवत नाहीस म्हणून तुला आयत्या घरात येणाऱ्या वस्तूंची किंमत नाही,’ अशी केलेली टिप्पणी गृहिणीच्या जिव्हारी लागते. या भावना अव्यक्त राहिल्याने गृहिणी या आजाराला सर्वाधिक जास्त बळी पडत आहेत.
दिवसभर शारीरिक श्रमाची कामे करून थकलेली मजूर महिला घरी जाताना जेवणसाठी जिन्नस नेईलच; पण त्याचबरोबर काहीही काम न करणाऱ्या पतीच्या दारूसाठीही ती पैसे बाजूला ठेवेल. घरी जाऊन त्याची मारहाण सहन करण्यापेक्षा त्याला दारूला पैसे देईल. कामाच्या ठिकाणी तिचे होणारे शोषण आणि घरात असा अत्याचार सहन करणाऱ्या मजुरांना तर त्यांच्या मेंदूतील बदलांचा गंधही नसतो. राग आला की तो मुलांवर काढायचा आणि नवऱ्याचा मार खायचा हीच त्यांची परंपरागत शिकवण असते.
आॅफिसात पंख्याखाली असो, वा गवंड्याच्या हाताखाली काम करणारी असो. महिलांना त्यांच्या घरातील कामात वाटेकरी न मिळाल्यामुळेच त्यांची अशी कुचंबणा होत आहे. यातून बाहेर पडावं, ही मानसिकताही महिलांमध्ये दिसत नाही, कारण हा मेंदूवरील अतिरिक्त ताण आहे, हेच त्यांना ज्ञात नसते.
(उद्याच्या अंकात वाचा,
काय आहेत याचे उपाय.)
ज्येष्ठांची जबाबदारी मोठी
अनेक घरांमध्ये नोकरी करणाऱ्या सुना आहेत. त्या आपल्या पतीला घरकामात मदत करण्याचा आग्रह करतात. काही वेळा पतीने ‘उत्साहा’ने केलेली मदत ज्येष्ठांना रुचत नाही. ‘असली कसली जगावेगळी तुमची नोकरीची गडबड. आम्ही नाही कधी लावलं आमच्या नवऱ्याला झाडू काढायला,’ असे म्हणत घरातील ज्येष्ठ टिप्पणी करतात; पण हातात झाडू घेतलेला पुरुष तो झाडू आहे तिथेच टाकून माजघरात जाऊन पेपर चाळतो. त्यामुळे नोकरदार महिलांना वेळेची आणि कामाची कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत घरातील ज्येष्ठांनी कोणतीही टिप्पणी न करणे ही त्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे.
गृहिणींच्या
कामाची किंमत
(एका महिन्याचा स्वत:शिवाय
चार जणांसाठी)
रोज सकाळचा नाष्टा : १२००/-
केर, फर्शी, आवरणे : १३००/-
मुलांचे आवरणे : ५००/-
सकाळचा स्वयंपाक : १०००/-
भांडी घासणे : ३००/-
कपडे धुणे : ५००/-
मुलांचा अभ्यास घेणे : १०००/-
मुलांना सांभाळणे : १०००/-
घर नीटनेटके ठेवणे : ५००/-
साहित्य आणणे : ५००/-
रात्रीचा स्वयंपाक : १०००/-
पाहुण्यांची उठाठेव : मोजदाद नाही
नातेवाइकांशी संपर्क : अमूल्य
काय आहेत लक्षणे :
विनाकारण चिडचिड होणे
मानसिक अस्वस्थता वाढणे
कोणत्याही कारणांनी खचून जाणे
प्रत्येक गोष्टीत चुका काढणे
कायम असमाधानी राहणे
एकाग्रता करता न येणे