मदनराव मोहितेंच्या निवडणूक भूमिकेबाबत सर्वांनाच उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:36 AM2021-03-06T04:36:32+5:302021-03-06T04:36:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड: गेले वर्षभर लांबलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड: गेले वर्षभर लांबलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीची शक्यता गृहीत धरून कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांसह दोन माजी अध्यक्षांनी महिनाभरापासूनच सभासद संपर्क दौरा व बैठकांवर जोर दिला आहे. निवडणुकीचे वातावरण तापत आहे. मात्र ,या सर्व घडामोडीत कारखान्याचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते मात्र कोठेच दिसत नाहीत. त्यामुळे ते प्रचारात कधी सक्रिय होणार? आणि त्यांची भूमिका काय असणार याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना लागली आहे.
सातारा व सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत गतवर्षीच संपली आहे. खरंतर मे-जून महिन्यात कारखाना निवडणूक अपेक्षित होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवल्याने विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली. त्यानंतरही निवडणुकीची कोणतीच प्रक्रिया दिसेना, तेव्हा काही सभासद न्यायालयात गेले व निवडणूक लवकर घेण्याची मागणी केली. न्यायालयानेही निवडणूक लगेच घेण्याची सूचना संबंधितांना केल्या; त्यामुळे ‘कृष्णा’ ची निवडणूक पूर्व प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसते.
कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा बँकेचे अध्यक्ष डाॅ. अतुल भोसले यांनी कार्यक्षेत्रातील गावोगावी जाऊन सभासद भेटी, बैठका सुरू केल्या आहेत. अतुल भोसले कऱ्हाड तालुक्यात प्रचारात असले की सुरेश भोसले वाळवा, कडेगाव तालुक्यात प्रचारात दिसतात. संस्थापक पॅनलचे प्रमुख, माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व त्यांच्या मातोश्री नूतन मोहिते यांनीही सभासद बैठकांवर लक्ष केंद्रित केले आहे. तर रयत पॅनलचे प्रमुख, माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते हेही सभासद दौरे करीत आहेत. या सगळ्यात सन १९८९ साली पहिल्या सत्तांतरानंतर अध्यक्ष झालेले मदनराव मोहिते मात्र कुठेच दिसत नाहीत याचे सभासदांना आश्चर्य वाटत आहे.
मदनराव मोहिते यांनी कृष्णा साखर कारखान्याचे सलग दहा वर्षे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांच्या सत्तेचा कालखंड हा सभासद सुवर्णकाळ म्हणून ओळखतात. त्यांच्या चांगल्या कार्यपद्धतीमुळे त्यांना मानणारा सभासद वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीबाबत ते कुठेच सक्रिय नाहीत व त्यांचे याबाबत कोणतेच भाष्य सध्या तरी दिसत नाही .
चौकट:
त्यांचा सोशल मीडियावर भर ...
माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते हे देखील सभासदांच्या बैठका घेत आहेत. मात्र त्याबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते प्रचारात आघाडीवर आहेत. अपवाद वगळता दररोज एक नवीन स्वतःचे मनोगत असणारा व्हिडिओ सभासदांना पोहोचेल अशी व्यवस्था सोशल मीडियाच्या माध्यमातून ते करीत आहेत. त्यालाही प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे.
चौकट:
मदनराव मोहिते नेमके कोणासोबत जाणार ...
गत विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘कृष्णा’चे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते हे भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारात सक्रिय होते. मात्र कृष्णा कारखाना निवडणुकीच्या घडामोडींना वेग आला असताना ; प्रसार सुरू झाला असताना मदनराव मोहिते सक्रिय का दिसत नाहीत हा प्रश्न उपस्थित होतोच!
----
फोटो 5 मदनराव मोहिते 01