सातारा जिल्हा परिषदेतील सत्तेत सबकुछ राष्ट्रवादीच ! अध्यक्षपद निवडीने राजकारण तापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:05 AM2019-11-29T11:05:09+5:302019-11-29T11:08:10+5:30
कारण, गेल्या १५ वर्षांत तरी राष्ट्रवादीने कधीच आघाडीतील घटकपक्ष असणा-या काँग्रेसला सत्तेत सामावून घेतलेले नाही. अनेकवेळा काँग्रेसने मागणी केली. एखाद्या समितीचे सभापतिपद तरी मिळावे, यासाठी प्रयत्न केले.
नितीन काळेल
सातारा : राजकारण कधी कोणते वळण घेईल, हे माहीत नसते. त्यामुळे या घडामोडीत कधी राजकारणाचे फासे बदलतील, हेही लक्षात येत नाही. अशाचप्रकारे राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले तरी जिल्हा परिषदेतील सत्तेत सबकुछ राष्ट्रवादीच असणार आहे. कारण, आतापर्यंत राष्ट्रवादीने कधीही आघाडीतील काँग्रेसलाही सत्तेत बरोबर घेतले नाही. त्यामुळे आताही राष्ट्रवादीची भूमिकाही स्वयंकेंद्रीतच असणार आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पुढील काही दिवसांत निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागलंय. तर जिल्हा परिषदेचा इतिहास पाहिल्यावर जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे बहुमत हे राष्ट्रवादीकडेच आहे.
निवडणुकीत राष्ट्रवादीचे ४० सदस्य निवडून आले होते. तर काँग्रेसचे ७, भाजप ७, शिवसेना ३, सातारा विकास आघाडी ३, कºहाड विकास आघाडी ३ आणि पाटण विकास आघाडी १ असे बलाबल राहिलंय. त्यातच भाजपचे सदस्य राहिलेल्या दीपक पवारांनी राजीनामा दिलाय. ते राष्ट्रवादीत गेलेत. त्यामुळे कुडाळ जिल्हा परिषद गटात पोटनिवडणूक लागली आहे.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. आरक्षण खुले असल्याने संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी अध्यक्षपद भूषविले.
आता पुन्हा एकदा अध्यक्षपदाचे आरक्षण खुलेच पडले आहे. त्यामुळे अनेकजण अध्यक्षपद मिळविण्यासाठी दावेदार झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात घडामोडी वाढणार आहेत. येत्या काही दिवसांत अध्यक्षपदाची निवड होईल. संजीवराजेंची पुन्हा अध्यक्षपदी वर्णी लागणार का? हा प्रश्न आहे. त्याचबरोबर पाठीमागील दावेदार असणारे मानसिंगराव जगदाळे हेही पुन्हा इच्छुक आहेत. संजीवराजे नसतील तर जगदाळेंनाच पक्षश्रेष्ठी पसंती देतील, असेच आजचे चित्र आहे.
कारण, जगदाळे हे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील हे ही बाजू भक्कमपणे मांडू शकतात. तसेच इतर समित्यांच्या सदस्यपदावरही राष्ट्रवादीतील सदस्यांचीच वर्णी लागू शकते.
राज्यात आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकासआघाडीचे सरकार येऊ घातले आहे; पण सातारा जिल्हा परिषदेत हा फॉर्म्युला लागू होण्याची सध्यातरी सुतराम शक्यता नाही. कारण, गेल्या १५ वर्षांत तरी राष्ट्रवादीने कधीच आघाडीतील घटकपक्ष असणाºया काँग्रेसला सत्तेत सामावून घेतलेले नाही. अनेकवेळा काँग्रेसने मागणी केली. एखाद्या समितीचे सभापतिपदतरी मिळावे, यासाठी प्रयत्न केले.
तरीही राष्ट्रवादीने त्याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे या महाविकासआघाडीलाही राष्ट्रवादी जवळ करणार नाही, हे निश्चित आहे. याचे दुसरे कारण असे की जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे बहुमत आहे. या बळावरच राष्ट्रवादी विरोधकांना जवळ करत नाही. आताही तसेच होणार, हे स्पष्ट आहे.
चौकट :
अध्यक्षनिवडीच्या वेळीच साताºयात पहिली चाचणी...
मुंबईत तिन्ही पक्षांच्या बैठकीत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकासआघाडी म्हणूनच लढविण्याचे ठरविण्यात आले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच हा निर्णय बुधवारी घेण्यात आलाय; पण सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड पुढील काही दिवसांत होत आहे. त्यावेळी बहुमतातील राष्ट्रवादी एखाद्या समितीचे पद तरी सहकारी पक्षांना देणार का ? हे पाहावे लागणार आहे. अध्यक्षपद निवड परीक्षेच्या निमित्ताने घोडे आणि मैदानही जवळच असून, ही पहिली चाचणी ठरेल.