विरोधकांकडून विकासाचा आव : गोरे
By Admin | Published: October 21, 2015 09:41 PM2015-10-21T21:41:34+5:302015-10-21T21:41:34+5:30
आडवे जाणाऱ्यांना आडवे करू
दहिवडी : ‘माण-खटावचा लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या सहा वर्षांत शेकडो सिमेंट बंधारे उभारले, रस्त्यांचे जाळे निर्माण केले. वीज, पाण्याच्या सुविधा निर्माण केल्या; मात्र या कामांचा गवगवा केला नाही. विरोधक मात्र पाच-पन्नास हजारांची कमान ठोकून आणि रस्त्यावर मुरुम टाकून विकासाचा आव आणत आहेत. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक १,४७५ कोटींचा निधी आणण्यात यश आले. यापुढेही माण-खटावच्या विकासाची प्रक्रिया जोमाने सुरू ठेवणार आहे,’ असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.कोळेवाडी, ता. माण येथे जिल्हा नियोजनमधून बांधण्यात येणाऱ्या १७ लाखांच्या बंधाऱ्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. माजी शिक्षण सभापती अॅड. भास्करराव गुंडगे, माढा लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ भोसले, चांगदेव सूर्यवंशी, हणमंतराव काटकर, तानाजी जायकर, सरपंच पुष्पलता सूर्यवंशी, चंद्रकांत रोमण, बाबा मदने, मंगेश रोमण, शामराव सूर्यवंशी, शंकर सूर्यवंशी, बाजीराव रोमण, किशोर नामदास, धनाजी मदने, बबन साळुंखे, उपसरपंच तावरे, लक्ष्मण जाधव, सत्यवान रोमण, नारायण रोमण आदी उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, ‘वाड्या-वस्त्यांवर विकासकामे पोहोचविण्यावर मी नेहमीच भर दिला. माण-खटावच्या मातीचा दुष्काळ हटवायचा निश्चय करूनच गेल्या पाच वर्षांत सिमेंट बंधारे पाणलोट, तलाव दुरुस्तीची शेकडो कामे केली. एकाचवेळी ९० गावांमधील अंतर्गत रस्ते मंजूर करून रस्त्यांचे जाळे निर्माण केले. साखळी सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होऊन शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. सध्या जनता केलेल्या कामांपेक्षा विकासाशी देणे-घेणे नसणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडत असल्याचे शल्य वाटते.
आडवे जाणाऱ्यांना आडवे करू
आपण कोट्यवधींची कामे गावोगावी साकारली आहेत. त्या कामांचा आपण गवगवा केला नाही; मात्र रस्त्यावर कमान उभारून आणि मुरूम पसरून गवगवा करणारे जनतेची दिशाभूल करत आहेत. यापुढे प्रेमाने आमच्याकडे येणाऱ्यांवर आम्हीही प्रेम करू. मात्र, आम्हाला आडवे जाणाऱ्यांना आडवेही करू,’ असा इशाराही त्यांनी दिला अॅड. भास्कराव गुंडगे म्हणाले, आ. गोरेंनी उभारलेल्या बंधाऱ्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.’