honeytrap: साताऱ्यातील माजी सैनिक अडकला हनीट्रॅपच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:26 PM2022-06-23T12:26:29+5:302022-06-23T12:27:13+5:30
अनोळखी नंबरवरून आला ‘तिचा’ फोन. थोडं व्हॅाट्सअॅपवर दोघांचं हाय हॅलो, झाल्यानंतर चॅटिंग सुरू झालं. त्यानंतर थेट व्हिडीओ काॅलपर्यंत दोघांचे सूर जुळले. अन् एकांतात भलतंच घडलं.
सातारा: घरात कोणी नसताना अनोळखी नंबरवरून माजी सैनिकाला ‘तिचा’ फोन आला. थोडं व्हॅाट्सअॅपवर दोघांचं हाय हॅलो, झाल्यानंतर चॅटिंग सुरू झालं. त्यानंतर थेट व्हिडीओ काॅलपर्यंत दोघांचे सूर जुळले. हे सूर इतके जुळके की, दोघांकडून एकांतात भलतंच घडलं. ‘तसला’ व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ‘तिने’ माजी सैनिकाकडून तब्बल १ लाख ८० हजार रुपये उकळले. हा धक्कादायक प्रकार साताऱ्यात उघडकीस आलाय.
साताऱ्यातील एका उपनगरात राहणारा ४५ वर्षीय माजी सैनिक काही दिवसांपूर्वी घरात एकटाच होता. त्या वेळी अनोळखी नंबरवरून त्यांना फोन आला. थोडी ओळखपाळख झाल्यानंतर दोघांनी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. व्हिडीओ काॅल करू का, अशी विचारणा केल्यानंतर तिला होकार मिळाला. तिने क्षणाचाही विलंब न करता माजी सैनिकाला व्हिडीओ काॅल केला. बोलत असतानाच ती व्हिडीओ काॅलवरच विवस्त्र झाली अन् त्यालाही विवस्त्र होण्यास तिनं भाग पाडलं. एकांतात माजी सैनिकाचा ‘तोल’ गेला.
पण काही वेळातच माजी सैनिकाला तिने ‘तसला’ व्हिडीओ पाठवला. तेव्हा माजी सैनिक पुरता हबकून गेला. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची तिने पैशासाठी धमकी दिली. त्यामुळे आपली समाजात इज्जत जाईल, या भीतीपोटी माजी सैनिक ती म्हणेल तसे पैसे देऊ लागला. टप्प्याटप्प्याने त्याने तिला तब्बल १ लाख ८० हजार रुपये आॅनलाईन पाठविले.
मात्र तरीसुद्धा तिची पैशाची भूक काही कमी होत नव्हती. व्हिडीओ डिलीट करायचे असतील तर आणखी पैसे दे, असा तगादा तिचा सुरू झाला. सरतेशेवटी तिच्या वाढत्या त्रासाला कंटाळून त्या माजी सैनिकाने शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. आपल्यासोबत घडलेला प्रसंग माजी सैनिकाने पोलिसांसमोर कथन केला. त्यानंतर पोलिसांनी ज्या नंबरवरून माजी सैनिकाला फोन आले, त्या दोन नंबरवरील अज्ञातावर गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे हे करीत आहेत.
आणखी काही जणांची टोळी असण्याचा संशय..
पुरुषांना हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकवणाऱ्या संबंधित महिलेसोबत आणखी काही जणांची टोळी असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे तीन हनिट्रॅपचे गुन्हे दाखल झाले आहेत. यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.