जिल्हा परिषदेतील अभियंत्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:41 AM2021-04-07T04:41:04+5:302021-04-07T04:41:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील काही शाखा व कनिष्ठ अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हतेवरच माहिती अधिकार कार्यकर्त्याने शंका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील काही शाखा व कनिष्ठ अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हतेवरच माहिती अधिकार कार्यकर्त्याने शंका उपस्थित केली, तसेच विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन शैक्षणिक कागदपत्रे तपासणीची मागणीही केली होती. आता आयुक्तांनीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून योग्य कार्यवाहीची करण्याची सूचना केली आहे. यामुळे लवकरच सत्य समोर येणार आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषदेत अनेक शाखा व कनिष्ठ अभियंते आहेत. हे अभियंते बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, लघु पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत. मात्र, काहींनी नोकरी व पदोन्नती मिळविताना बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा वापर केल्याबाबत साताऱ्यातील संतोष शेंडे या माहिती कार्यकर्त्याने शंका उपस्थित केली आहे. या कार्यकर्त्याने माहिती अधिकारातही जिल्हा परिषदेतील बांधकामाच्या उत्तर विभागातील अभियंत्यांची माहिती मागविली होती.
टप्प्याटप्प्याने टपालाद्वारे कागदपत्रांच्या सत्यप्रती माहिती अधिकार कार्यकर्त्याला मिळाल्या. मात्र, काही अभियंत्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांत विसंगती दिसून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शैक्षणिक अर्हतेवरील शंका आणखी गडद होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडेच निवेदनाद्वारे शैक्षणिक कागदपत्रे तपासणीची मागणी केली होती.
विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापनाचे उपायुक्त डॉ. पी. बी. पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना पत्र पाठविले आहे. यामध्ये तक्रार अर्जातील विषयाच्या अनुषंगाने चौकशी करावी, तसेच शासन नियमाप्रमाणे योग्य कार्यवाही करून तक्रारदारांना कळविण्यात यावे, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील शाखा व कनिष्ठ अभियंत्यांची शैक्षणिक कागदपत्रे तपासणीस लवकरच सुरुवात होणार आहे. यातून सत्य समोर येण्यास मदत होणार आहे.
कोट :
जिल्हा परिषदेतील काही शाखा व कनिष्ठ अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत शंका आहे. त्यामुळे अभियंत्यांची शैक्षणिक कागदपत्रे तपासणीची मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली होती. नुकतेच आयुक्तांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सखोल चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे अभियंत्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी सुरू होईल. त्याचबरोबर यामधून निश्चितच सत्य बाहेर येईल.
- संतोष शेंडे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सातारा.
------------------------------