सातारा जिल्हा परिषद नोकर भरतीत दीड महिन्यात ४५०० उमेदवारांची परीक्षा, पाचवा टप्पा सुरू
By नितीन काळेल | Published: December 19, 2023 06:27 PM2023-12-19T18:27:52+5:302023-12-19T18:28:40+5:30
३१ संवर्गातील वर्ग तीनमधील पदे भरण्यात येणार
सातारा : मागील अनेक वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेतील नोकर भरती सुरू असून एकूण ३१ संवर्गातील वर्ग तीनमधील पदे भरण्यात येणार आहेत. तर आतापर्यंतच्या दीड महिन्याच्या कालावधीत सातारा जिल्ह्यात साडे चार हजारांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. यामध्ये इतर जिल्ह्यातीलही परीक्षार्थींचा समावेश आहे.
राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेतील नोकर भरती अनेक वर्षे रखडली होती. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत होता. तसेच काही प्रमाणात कंत्राटी कर्मचारी घेऊनही कामे करण्यात येत होती. तरीही कामांचा निपटारा होत नव्हता. यामुळे जिल्हा परिषदेतील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांची नोकर भरती करण्यासाठी जोरदार मागणी करण्यात येत होती. त्यामुळे राज्य शासनाने जुलै महिन्यापासून वर्ग तीनमधील पदे भरण्यासाठी नोकर भरती जाहीर केली. या भरतीच्या माध्यमातून राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेतील हजारो पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी मागील दीड महिन्यापासून परीक्षा घेण्यात येत आहे. तसेच राज्यात एकाचवेळी एका संवर्गासाठी परीक्षा होत आहे.
सातारा जिल्हा परिषदेतीलही रिक्त तब्बल ९७२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही भरती विविध २१ संवर्गासाठी होत आहे. यासाठी ७४ हजार ५७८ उमेदवारांनी अर्ज केला होता. या भरतीसाठी ३१ मार्च २०२४ ची संभाव्य रिक्त पदे ग्राह्य धरण्यात आलेली आहेत. तसेच योग्य पदातून १० टक्के ग्रामपंचायत कर्मचारी आणि २० टक्के अनुकंपा पदे वगळून ९७२ पदांसाठी भरती होत आहे. सातारा जिल्ह्यात सातारा शहर तसेच कऱ्हाडमधील काही केंद्रावर ही परीक्षा होत आहे.
जिल्हा परिषद नोकर भरतीसाठी परीक्षा होताना उमेदवार राज्यात कोठेही परीक्षा देऊ शकतो. सातारा जिल्ह्यातही आतापर्यंत साडे चार हजार उमेदवारांनी २१ संवर्गासाठी परीक्षा दिलेली आहे. यामध्ये दोरखंडवाला, वरिष्ठ सहायक लेखा व प्रशासन, विस्तार अधिकारी सांख्यिकी व कृषी, आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक निम्नश्रेणी, लघुलेखक उच्चश्रेणी, कनिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिक व विद्युत, वायरमन, जोडारी, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी शिक्षण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी पंचायत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांचा समावेश आहे. सध्या राहिलेल्या १० संवर्गासाठी परीक्षा सुरू आहेत.
परीक्षेचा पाचवा टप्पा सुरू..
जिल्हा परिषद नोकर भरती परीक्षेचा पाचवा टप्पा दि. १८ डिसेंबरपासून सुरू झाला आहे. दि. १८ ते २० डिसेंबरदरम्यान प्रशासनमधील कनिष्ठ सहाय्यकपदासाठी परीक्षा आहे. तर २१ आणि २६ डिसेंबर रोजी औषध निर्माण अधिकारी त्याचबरोबर २३ आणि २४ डिसेंबरला स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदासाठीची परीक्षा राज्यभरात घेण्यात येणार आहे. त्यानंतरही इतर संवर्गाची परीक्षा होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.