परीक्षा विभागाने वाढविले वीस हेल्पलाइन नंबर्स !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:40 AM2021-04-24T04:40:23+5:302021-04-24T04:40:23+5:30
कराड : शिवाजी विद्यापीठामार्फत सध्या अनेक पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. मात्र बीकॉम भाग ३ च्या ...
कराड : शिवाजी विद्यापीठामार्फत सध्या अनेक पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. मात्र बीकॉम भाग ३ च्या परीक्षार्थींना गुरुवारी पहिल्याच दिवशी परीक्षा देताना अडचणी आल्या. विद्यापीठाचे हेल्पलाइन नंबर हेल्पलेस ठरले. त्यामुळे ‘पदवीच्या ऑनलाइन परीक्षेचा गोंधळ’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेऊन शुक्रवारी विद्यापीठांनी नवीन वीस हेल्पलाइन नंबर्स समाविष्ट केले आहेत. त्याचे नवीन परिपत्रक विद्यार्थी व महाविद्यालयांना पाठवले आहे. त्याबरोबर परीक्षा विभागाने महाविद्यालयांची संपर्क साधून परीक्षेत काही अडचण येत नाही ना, याची खातरजमा करून घेतली. तसेच अडचणी दूर करण्याचे आश्वासनही दिले .
कोरोनाच्या महामारी संकटामुळे शिवाजी विद्यापीठाने ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षेचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवला होता. त्यातील एक पर्याय विद्यार्थ्यांनी निवडायचा आहे. त्यानुसार गुरुवारी बीकॉम भाग ३ च्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा सुरू झाली. परीक्षार्थींना विद्यापीठांनी लॉगइन आयडी आणि पासवर्ड अगोदरच पाठवून दिले होते. परीक्षार्थींना याबाबत काही अडचण वाटल्यास मदतीसाठी पाच हेल्पलाइन नंबर्स दिले होते.
गुरुवारी पहिल्या पेपरला विद्यार्थ्यांना लॉगइन करताना अडचणी आल्या. मग त्यांनी हेल्पलाइनला फोन केले; पण त्यातील तीन नंबर बंद होते. तर दोन नंबर व्यस्त होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेचा वेळ वाया गेला. शैक्षणिक नुकसान झाले. याबाबत परीक्षार्थींनी ‘लोकमत’शी संपर्क केल्यानंतर लोकमतने त्याबाबतचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. लोकमतच्या बातमीची दखल घेऊन शुक्रवारी (दि. २३) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने नवीन परिपत्रक काढून त्यात नवीन २० हेल्पलाइन नंबर्सचा समावेश केल्याचे कळवले आहे. आता विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईनचे २५ नंबर्स उपलब्ध झाले आहेत.
त्याबरोबरच परीक्षा विभागाने अनेक महाविद्यालयांशी संपर्क करून परीक्षार्थींना काही अडचणी येत आहेत का, याची माहिती घेतली. विद्यापीठाच्या हेल्पलाइन नंबर्सची यापुढे तक्रार येणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिले.
शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांत बीकॉम भाग ३ च्या परीक्षा झाल्या. या परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने कारभारात सुधारणा केल्याचे दिसून येते.
चौकट
विद्यार्थ्यांतून समाधान
ऑनलाइन परीक्षेच्या वेळी येणारी अडचण ‘लोकमत’ने वृत्तपत्रातून मांडली. त्याची दखल घेऊन विद्यापीठानेही सकारात्मकता दाखवली. परीक्षार्थीसाठी नवीन २० हेल्पलाइन नंबर्स वाढवले. त्याबद्दल विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.