सेनापतींचा ‘उत्तम’ कारभार; मात्र सैन्याचा नाही हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:25 AM2021-06-23T04:25:50+5:302021-06-23T04:25:50+5:30
औंध : औंध पोलीस ठाण्यात सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत एका पोलीस कॉन्स्टेबलसह पोलीस उपनिरीक्षकाच्या पतीवर कारवाई केली. ...
औंध : औंध पोलीस ठाण्यात सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत एका पोलीस कॉन्स्टेबलसह पोलीस उपनिरीक्षकाच्या पतीवर कारवाई केली. यामुळे औंध पोलीस ठाण्याच्या प्रतिमेला धक्का बसला असून ठाण्याच्या सेनापतीला अंधारात ठेवून परस्पर कार्यक्रम करणाऱ्या सैन्याला येथून पुढे तरी चाप बसणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर उपनिरीक्षकाच्या पतीने केलेल्या उचापतीमागे कोणाचा हात आहे, असा प्रश्न औंधकरांच्या मनात घोळत आहे.
औंध पोलीस ठाण्यातील २०११ पासूनची ही तिसरी घटना आहे. मागील दोन घटना आपल्याच पोलीस ठाण्यात घडल्या असून, आपण सर्वसामान्य जनतेला कसा न्याय द्यावा हे कर्मचाऱ्यांना अद्याप समजले नसल्याचे सोमवारच्या घटनेने उघड झाले आहे. पोक्सो प्रकरणातील तक्रारदारांना बिनधास्तपणे ‘तुम्हाला गुन्ह्यात मदत करतो आणि एवढीच रक्कम पाहिजे,’ असे म्हणणाऱ्या दप्तरी कारकुनाला एवढी ताकद येतेच कुठून, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. त्यातच तक्रारदारांना प्रचंड मानसिक त्रास देऊन त्यांना लाचलुचपत विभागाचे दरवाजे ठोठावण्यास भाग पाडले.
औंध पोलीस ठाण्यातील दप्तरी कारकून असणाऱ्या शिंदेला पुसेसावळी दूरक्षेत्रातील गावातील गुन्हे उघड करण्यासाठी खूपच रस असल्याचे दिसून आले.
मागील काही महिन्यांतच औंध पोलीस ठाण्याची तपासणी झाली. यासाठी सहायक पोलीस निरीक्षक यांनी मेहनत घेऊन पोलीस ठाण्याचा चेहरामोहरा बदलला, मात्र आत दप्तरी असणाऱ्या मोहऱ्याचा अंदाज त्यांना लावता आला नाही. त्यामुळे सेनापतींचा जरी ‘उत्तम’ कारभार असला तरी सैन्याचा हातभार नसल्याने ही वेळ येऊन ठेपली असल्याचे बोलले जात आहे.
चौकट
चंद्रकांतचा ...' स्नेह' नडल्याची चर्चा
औंध पोलीस ठाण्यातील दप्तरी कारकून चंद्रकांत शिंदे याचा पोलीस ठाणे व परिसरातील लोकांशी असणारा वाढत असणाऱ्या 'स्नेहा'पुढे त्याला काही दिसत नव्हते. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक पदाची स्वप्ने बघणारा शिंदेला 'स्नेह' नडल्याची चर्चा औंधसह तालुक्यात आहे.
हैद्राबादला फौजदारी रुबाब
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तपासी अधिकाऱ्याबरोबर हा कारकून रीतसर सुटी टाकून हैदराबादला जाऊन तिथे तक्रारदाराच्या नातेवाईकाला मारहाण केली. तिथे आराम करून जिवाची मुंबई करून आला असल्याचे तक्रारदार यांनी खासगीत ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे हैदराबाद येथेही आपला रुबाब दाखविला असल्याची चर्चा आहे.
चौकट:-
गव्हाबरोबर किडेही
औंध पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र कालच्या घटनेने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांचा बदलू शकतो. त्यामुळे शिंदे आणि उचापती यामुळे गव्हाबरोबर किडे रगडू शकतात.
कारवाईचा विक्रम
औंध पोलीस ठाण्यातील या सापळ्यासह कारवाईचा विक्रम झाला आहे. यापूर्वी २०११ मध्ये सहायक पोलीस निरीक्षक, २०१८ मध्ये पोलीस उपनिरीक्षक आणि आता २०२१ मध्ये पोलीस कॉन्स्टेबल व पोलीस उपनिरीक्षकाचा पती अशी हॅटट्रिक झाली आहे. त्यामुळे कर्मचारी आता किती बोध घेणार हे येणारा काळच ठरविणार आहे.