मोबाईलच्या अतिवापराने मेंदू झाला आळशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:01+5:302021-07-07T04:49:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलने प्रचंड मोठी क्रांती आणली आहे. मोबाईल सामान्यांच्या आवाक्यात आल्यानंतर प्रत्येकालाच ...

Excessive use of mobiles has made the brain lazy | मोबाईलच्या अतिवापराने मेंदू झाला आळशी

मोबाईलच्या अतिवापराने मेंदू झाला आळशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलने प्रचंड मोठी क्रांती आणली आहे. मोबाईल सामान्यांच्या आवाक्यात आल्यानंतर प्रत्येकालाच त्याने गुलाम करून टाकलं. पूर्वी शेकडो नंबर तोंडपाठ असलेल्यांना आता नंबर आठवत नाहीत. डायल केलं की लगेच कॉल लागतो. त्यामुळे बहुतांश जणांचा मेंदू आळशी बनला आहे.

लोकांच्या आयुष्यात मोबाईल येण्याआधी प्रत्येकाला इतरांचे फोन क्रमांक तोंड पाठ असायचे. आता मोबाईल मेमरीमुळे स्वत:चा पहिला नंबर सोडला तर कोणाचाच नंबर लक्षात राहत नसल्याचे समोर आले आहे. गणकयंत्र अर्थात कॅलक्युलेटर आल्यानंतर यंत्रावर इतकं अवलंबत्व झालं की लाखोंचे व्यवहार तोंडी करणारी माणसं अक्षरश: इतिहासजमा झाली. मोबाईल अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. अगदी सहज लक्षात ठेवण्याच्या गोष्टींसाठीही मोबाईलचा वापर केला जाऊ लागला आहे. जी मुले किंवा ज्येष्ठ व्यक्ती मोबाईलचा वापर अगदी मोजका करतात किंवा अजिबात करत नाहीत त्यांची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती चांगली असल्याचे दिसून येत आहे.

चौकट :

१. असे का होते?

विचार करण्याची प्रक्रिया न करणे

आठवणी, स्मरणशक्ती याकडे दुर्लक्ष करणे

पाठांतराची सवय मोडीत निघणे

कोणत्याही गोष्टीत थेट सोपी पध्दत वापरणे

नैसर्गिक बुद्धिमत्तेचा वापर करणं टाळणे

अस्थिरता, अस्वस्थता आणि चंचलता वाढणे

२. हे टाळण्यासाठी...!

गॅझेटमु्क्त आठवडा पाळण्यासाठी प्रयत्न

पुरेशी झोप घेण्यासाठी मोबाईल लांब ठेवून झोपा

बुद्धिबळ, कॅरम, स्मरणशक्तीचे खेळ खेळणे

स्तोत्र मंत्र, कविता, भाषण, संवाद कला जोपासणे

चिंतन, मनन, प्राणायाम, योग व्यायाम नियमित करणे

कोट

मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे घरातील संवाद संपला आहे. मोबाईलवरील अवलंबित्व वाढले आहे. त्यामुळे सगळे सक्रिय जिवंत स्मृतींमध्ये साठवावे याचे भान राहिलेले नाही. यासाठी निर्जीव यंत्राचा आधार घ्यावा लागत आहे. आठवड्यातून एक दिवस झिरो स्क्रिन डे पाळणं उपयुक्त ठरेल. बुद्धिकौशल्य पणाला लावणाऱ्या खेळांना प्राधान्य, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बुद्धीचा वापर करणे, योग्य झोप व व्यायाम अत्यावश्यक आहे.

- डॉ. अनिमिष चव्हाण, मानसोपचारतज्ज्ञ

ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल मुलांच्या जीवनाचाही अविभाज्य घटक बनला आहे. कुटुंबातील सर्वांचे नंबर मुलांना पाठ व्हावेत म्हणून आम्ही त्यांना लँडलाईनवरून फोन करण्याची सक्ती केली होती. गॅझेटवर भरवसा ठेवून चालणार नाही, हे माझ्या लक्षात असल्याने बरेच नंबर पाठ केलेत.

- बाळासाहेब ठक्कर, पालक

पूर्वी लँडलाईनचे ५ आकडी नंबर पाठ होते, मोबाईल आल्यावरही पाच पाच अंक लक्षात ठेवले. जवळच्या प्रत्येकाचे नंबर मला पाठ आहेत. आधुनिक युगाबरोबर चालताना सुना नातवंडे यांच्याबरोबरचं मी पण सोशल मीडियावर आहे. पण स्मरणात असलेले नंबर मी डायल करून मगच लावते. मोबाईलमुळे मेंदूचा वापर कमी केला नाही.

- मंजुळा ठक्कर, ज्येष्ठ नागरिक

ऑनलाइन क्लाससाठी मला मोबाईल लागतो. याशिवाय मोबाईल वापराची परवानगी नसल्याने दिवसभर अन्य गोष्टींमध्ये वेळ जातो. मोबाईल दिल्यानंतरही किमान दोन महिने कोणाचेही नंबर त्यात सेव्ह करायची परवानगी मम्मी डॅडींनी दिली नव्हती. नंबर पाठ झाल्यावरच नंबर सेव्ह करा, असा कुटुंबाचा शिरस्ता होता.

- दानिश ठक्कर, विद्यार्थी

.......................

Web Title: Excessive use of mobiles has made the brain lazy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.