जिल्ह्यात उत्पादन शुल्कचे छापे;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:35 AM2021-04-26T04:35:46+5:302021-04-26T04:35:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : येथील राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पांडे, ता. वाई आणि नायगाव, ता. कोरेगाव येथे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : येथील राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पांडे, ता. वाई आणि नायगाव, ता. कोरेगाव येथे छापे टाकून अवैधरीत्या दारूच्या बाटल्या व दोन कार असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत माहिती अशी, साताऱ्यातील राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पांडे, ता. वाई या गावच्या हद्दीत छापे भरारी पथकाने टाकले. यावेळी तुषार सुरेश पवार, रा. पांडे याच्या ताब्यातून ७५० मि.लि. क्षमतेच्या फक्त गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या विदेशी दारूच्या एकूण ४७ सीलबंद बाटल्या, १८० मि.लि. क्षमतेच्या विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या एकूण १३१ सीलबंद बाटल्या. देशी दारू संत्राच्या एकूण ४८ सीलबंद बाटल्या व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे नायगाव, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत अतुल पोपट धुमाळ, रा. नायगाव, ता. कोरेगाव याच्या ताब्यातून ७५० मि. लि. क्षमतेच्या फक्त गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या विदेशी दारूच्या एकूण १२ सीलबंद बाटल्या व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
दोन्ही ठिकाणी दोन चारचाकी वाहनांसह एकूण २ लाख ५० हजार ५१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, रोहित माने, संतोष निकम, सचिन खाडे, महेश मोहिते, नितीन जाधव, अजित रसाळ, सागर साबळे, उदय जाधव, किरण जंगम यांनी भाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर हे करीत आहेत.