खंडाळा तालुक्यात उत्पादन शुल्कचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:40 AM2021-02-16T04:40:42+5:302021-02-16T04:40:42+5:30
सातारा : खंडाळा तालुक्यातील शेखमीरवाडी, शिरवळ आणि आसवली येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गावठी दारूच्या अड्ड्यावर ...
सातारा : खंडाळा तालुक्यातील शेखमीरवाडी, शिरवळ आणि आसवली येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने गावठी दारूच्या अड्ड्यावर छापे टाकून ६ लाख १९ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. यावेळी चारजणांना अटक करण्यात आली.
सुरेंद्र राजेंद्र कुंभार (रा. शेखमीरवाडी), आदेश अनिल कुंभार (रा.धनगरवाडी, खंडाळा), राहुल संजय पवार, वैभव संजय सोनमळे (रा.लिंब, ता.सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा विभागातील भरारी पथकाने राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अनिल चासकर (सातारा) यांच्या मार्गदर्शनाखाली शेखमीरवाडी, शिरवळ व आसवली याठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी दारू विक्री व वाहतुकीवर छापे टाकले. या छाप्यात एक चारचाकी, एक दुचाकीसह ७०३ लिटर हातभट्टी दारू जप्त केली. तसेच सुरेंद्र कुंभार, आदेश कुंभार, राहुल पवार आणि वैभव सोनमळे यांना अटक करण्यात आली.
या कारवाईमध्ये निरीक्षक आर. एल. पुजारी, दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, अजित रसाळ, सचिन खाडे, महेश मोहिते, संतोष निकम, जीवन शिर्के, नितीन जाधव, किरण जंगम यांनी भाग घेतला. दरम्यान, बनावट मद्य, हातभट्टी दारू आढळल्यास व त्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती या तत्काळ द्यावी, असे आवाहन अनिल चासकर यांनी केले आहे.
फोटो : १५ खंडाळा कारवाइ