‘घरगुती काँग्रेस’ला हद्दपार करा
By admin | Published: February 12, 2017 10:28 PM2017-02-12T22:28:18+5:302017-02-12T22:28:18+5:30
मदनदादा मोहिते : गोंदी येथे उमेदवार प्रचारार्थ सभा; सगळीच पदे घरात वाटून घेतली
कऱ्हाड : ‘मी मंत्री, तू आमदार, तू जिल्हाध्यक्ष, तू खजिनदार... अशी सगळी पदे घरातच वाटून घेणारी ‘घरगुती काँग्रेस’ कऱ्हाड तालुक्यात निर्माण झाली असल्यामुळे या काँग्रेसचा मी त्याग केला आहे. मतदारांनीही आता अशा ‘घरगुती काँग्रेस’ला कऱ्हाड तालुक्यातून कायमचे हद्दपार करा,’ असे आवाहन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनदादा मोहिते यांनी केले.
गोंदी, ता. कऱ्हाड येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
याप्रसंगी भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, भाजपाच्या रेठरे बुद्रुक जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शामबाला बबन घोडके, शेरे पंचायत समिती गणाचे उमेदवार बाळासाहेब निकम, उपसरपंच किशोर पवार, कऱ्हाड तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक लालासाहेब पवार, माजी उपसरंपच गुणवंतराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य हणमंत मदने, प्रकाश कुंभार, गोंदी विकास सोसायटीचे उमेदवार विजय पवार, उपाध्यक्ष धर्मेंद्र माने, संचालक दिलीप पवार, रमेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीवर टीका करताना मदनदादा मोहिते म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण हे दरबारी राजकारणात मुरले आहेत. पण असले राजकारण या भागात चालत नाही. जनमत वाढविण्यासाठी लोकांत मिसळणे महत्त्वाचे आहे, असे वारंवार सांगूनही त्यांनी माझ्या सांगण्याकडे कधीच लक्ष दिले नाही. केवळ निधी वाटून माणसे मागे येत नाहीत, हे आता त्यांनी ध्यानात घ्यायला पाहिजे.’
मोहिते-भोसले मनोमिलनावर भाष्य करताना पुढे मोहिते यांनी स्पष्ट केले की, ‘आमच्या घराण्यात कर्तबगार मंडळी असूनही संघर्षामुळे घराण्याचे मोठे नुकसान झाले आहे. संघर्षात नेहमी दुसऱ्याचा फायदा होत असल्यानेच आम्ही दोन्ही कुटुंबांनी कटुता संपवून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनीही आपापसातील मतभेद मिटवून भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कंबर कसावी. भविष्यात आमदार होण्याची उमेद केवळ अतुलबाबांच्यात असून, त्यांना आमदार करणे हेच माझे ध्येय आहे.’
भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘केंद्र आणि राज्यपाळीवरून निधी खेचून आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही आपल्या विचारांचे लोक निवडून येणे गरजेचे आहे. निवडणूक तोंडावर आली तरी विरोधी आघाड्यांमध्ये अजूनही अनिश्चितता आहे. गट कुणी लढवायचा आणि गण कुणी लढवायचा याबाबत संभ्रमावस्था आहे. चिन्हाचा तर अजून पत्ताच नाही. अशा परिस्थितीत भाजपाच्या उमेदवारांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली असल्याने आपला विजय निश्चित आहे.’
अर्जुन पवार यांनी स्वागत व प्रास्तविक केले. संदीप यादव यांनी सूत्रसंचालन केले. विजय पवार यांनी आभार मानले. गोंदी, शेरे या भागातील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)