थकीत बिलापोटी कऱ्हाड पालिकेची वीज तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:42 AM2021-09-18T04:42:23+5:302021-09-18T04:42:23+5:30
दरम्यान पालिकेच्या मुख्य कार्यालयासह ड्रेनेज विभागाचे पंपिंग स्टेशनचे वीज कनेक्शन शुक्रवारी तोडण्यात आले असून थकीत रक्कम न भरल्यास पालिकेच्या ...
दरम्यान पालिकेच्या मुख्य कार्यालयासह ड्रेनेज विभागाचे पंपिंग स्टेशनचे वीज कनेक्शन शुक्रवारी तोडण्यात आले असून थकीत रक्कम न भरल्यास पालिकेच्या अन्य प्रकल्पांचेही कनेक्शन तोडण्यात येणार असल्याची माहिती वीज कंपनीचे सहायक अभियंता बाबासाहेब पवार यांनी दिली.
कऱ्हाड पालिकेच्या मुख्य कार्यालयाचे १ लाख ४७ हजार ५५० रूपयांचे वीज बील थकीत आहे. तसेच ड्रेनेज विभागाच्या पंपिंग स्टेशनचीही वीज बिले थकीत आहेत. त्यासहीत अन्य ठिकाणची थकीत रक्कम ७ लाख ९१ हजारापर्यंत आहे. पालिकेकडे महिनाभरापासून वीज कंपनीने बिलाच्या वसुलीसाठी तगादा लावला होता. मात्र, बिल भरण्यास पालिका टाळाटाळ करत होती. अखेर शुक्रवारी पालिकेच्या मुख्य कार्यालयाचे वीज कनेक्शन तोडण्यात आले.
ड्रेनेज विभागाच्या पंपिंग स्टेशनचेही वीज कनेक्शन वीज कंपनीने तोडले आहे. पंपिंग स्टेशन क्रमांक तीनचे कनेक्शन तोडल्याने तेथील यंत्रणा बंद पडली आहे. अन्य पंपिंग स्टेशनचेही वीज कनेक्शन टप्प्याटप्प्याने तोडले जाणार आहे. शहरातील पालिकेच्या सर्व विभागाचे मिळून जवळपास ७ लाख ९१ हजारांचे बिल थकीत आहे. त्यात स्टेडियमचे पथदिवे, जलशुद्धीकरण केंद्र, पंपिंग स्टेशन यासह अन्य यंत्रणेचाही समावेश आहे. संबंधित थकीत रक्कम पालिकेने न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाणार आहे.
- चौकट
पालिकेचा भार ‘जनरेटर’वर
वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी दुपारी पालिकेत पोहोचले. त्यांनी थकीत बिलाविषयी चर्चा करुन थेट कनेक्शन तोडले. त्यामुळे पालिकेतील सर्व यंत्रणा पूर्णपणे बंद पडली. यंत्रणाच बंद पडल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना विजेची वाट पाहत थांबावे लागले. त्यानंतर जनरेटर सुरू करुन पालिकेतील कामकाज करण्यात आले.