पाटण तालुक्यातील पुलांचे अस्तित्वच गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:19+5:302021-07-30T04:40:19+5:30
रामापूर : पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गांवरील पुलांना बसल्याने नदी, ओढ्यांवरील पुलांचे जीवनमान धोक्यात आले ...
रामापूर : पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गांवरील पुलांना बसल्याने नदी, ओढ्यांवरील पुलांचे जीवनमान धोक्यात आले आहे तर काही पूल अस्तित्वातच राहिले नसल्याने तालुक्यातील डोंगरकपारीत राहणाऱ्या वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांना दळणवळणासाठी त्रास होत आहे.
पाटण तालुक्यात अतिवृष्टीने केरा विभागातील पाटण ते चाफोली या मार्गावर मेष्टेवाडी, केरा, घाणव, चाफोलीपर्यंत अनेक पुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना वाहतुकीकरिता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या विभागातील बोद्री आणि आंबवणे या गावच्या पुलांचे अस्तित्वच नष्ट झाल्यामुळे वाहतुकीचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मोरणा विभागातील गुरेघर धरणापर्यंत आणि तेथून ओटील-पाचगणीपर्यंत असणाऱ्या रस्त्यावर असणारे लहान आणि मोठे पूलच वाहून गेल्याने डोंगरपठारावर राहणाऱ्या अनेक गावांची दळवळणाची गैरसोय होत आहे. कुसरुंड ते कदमवाडी, कळकेवाडी या मार्गावर फरशीच वाहून गेल्याने दळणवळणाची गैरसोय होत आहे.
चौकट..
यापुढे पूल बांधताना अभ्यास करून बांधावा..
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत रस्त्यांचे नुकसान झाले आहे. हे झालेले नुकसान लवकर भरून न येणारे आहे. त्यामुळे किमान नवीन पूल बांधताना अभियंत्यांनी तालुक्यात पडत असलेल्या पावसाचा अभ्यास करून पुलाची रचना करावी आणि पुलामध्ये पाईपच्याऐवजी उच्च प्रतीचे स्लॅब पद्धतीचे पूल बांधण्यात यावेत, अशी मागणी तालुक्यातील बाधित गावांमधील ग्रामस्थांकडून होत आहे.
२९ रामापूर
फोटो - पाटण तालुक्यात अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गांवरील पूल, रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. (छाया : प्रवीण पवार)