दारूबंदीची परंपरा बाहेरच्या विक्रेत्यांनी मोडली !
By admin | Published: February 13, 2015 12:18 AM2015-02-13T00:18:19+5:302015-02-13T00:49:30+5:30
गोपूज : व्यवसाय तेजीत अन् पोलिसांचे मात्र दुर्लक्ष
औंध : गोपूज, ता. खटाव येथे खुलेआम दारूविक्री सुरू आहे. या परिसरात दारूचा उघडपणे व्यवसाय सुरू असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेत त्याकडे दुर्लक्ष केले आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, येथील दारूबंदीची परंपरा बाहेरील लोकांनी मोडीत काढली आहे. गोपूज येथे रहदारीचे मोठे प्रमाण आहे. लोकांची ये-जा ही अधिक असते. या ठिकाणी व परिसरात जवळपासच्या खेड्यापाड्यातील काहीनी दारू विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दारूबंदीची परंपरा असणाऱ्या या गावात बाहेरील लोकांनी ही परंपरा तोडली आहे. त्यामुळे या दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करायचा कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
मागील महिन्यात २६ जानेवारीला ग्रामसभा झाली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी दारूबंदीसाठी कारखाना परिसरातील दारू विक्रेत्यांना चोप देण्याचे ठरविले होते. परंतु, लोकांचा मोर्चा आपल्याकडे येत आहे, हे पाहताच विक्रेत्यांनी पळ काढला होता. त्यानंतर दोन दिवस शांत राहण्याची भूमिका घेतली आणि पुन्हा त्यांनी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.
गोपूज ग्रामस्थांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. दारूविक्री बंद करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक पावले उचलली आहेत. त्यांना सर्वांची साथही आहे. गोपूज व परिसरातील अवैध दारू विक्री दोन दिवसांत बंद करावी. याबाबत निर्णय न झाल्यास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना भेटणार आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.