महावितरणच्या नवप्रकाश योजनेला मुदतवाढ
By admin | Published: March 11, 2017 09:40 PM2017-03-11T21:40:53+5:302017-03-11T21:40:53+5:30
ग्राहकांना दिलासा : लाभ घेण्याचे केले आवाहन; थकबाकीमुक्तीसाठी पुढाकार
सातारा : थकित वीज देयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळून इतर सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू असलेल्या नवप्रकाश योजनेला येत्या ३१ जुलै २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.मुदतवाढ मिळालेल्या नवप्रकाश योजनेनुसार आता येत्या ३० एप्रिल २०१७ पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास शंभर टक्के व्याज व विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. याआधी ही मुदत ३१ जानेवारी २०१६ पर्यंत होती.
तसेच १ मे ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत मूळ थकबाकीसह व्याजाची २५ टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ७५ टक्के व्याज व शंभर टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे.या योजनेत दि. ३१ मार्च २०१६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषिपंपधारक, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक तसेच इतर वर्गवारीतील (सार्वजनिक नळयोजना ग्राहक वगळता) वीजग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय लोकअदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांना सहभागी होता येणार आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणात हुकूमनामा मंजूर होऊन १२ वर्षांपेक्षा अधिक झाली असल्यास अशा ग्राहकांनाही या योजनेत सहभागी होता येईल.
मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर आॅनलाईन सोय असून, संबंधित ग्राहकांच्या थकित देयकांची व किती रक्कम भरायची याबाबत माहिती उपलब्ध केली आहे.
या योजनेत सहभाग घेऊन थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीजजोडणी देण्यात
येत आहे. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येत
आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर संबंधित ग्राहकांच्या थकित देयकांची व किती रक्कम भरायची याची माहिती उपलब्ध आहे. ही रक्कम आॅनलाईनसह धनादेशद्वारेही भरता येणार आहे.
याशिवाय महावितरणच्या शाखा ते मंडल कार्यालयांत नवप्रकाश योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना थकबाकीच्या रकमेचा तपशील तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)