Satara: कऱ्हाड विमानतळाचे विस्तारीकरण लवकरच - केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 01:54 PM2024-08-12T13:54:33+5:302024-08-12T13:54:57+5:30
सुमारे ७० आसनक्षमता असलेली विमान वाहतूक सुरू होणार
कऱ्हाड : कऱ्हाड विमानतळाचा विस्तार करण्यासाठी ४८ हेक्टर जागेची गरज आहे. पैकी ३८ हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. उरलेल्या १० हेक्टरचे भूसंपादन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन येत्या पंधरा-वीस दिवसांमध्ये प्रशासन करण्याचा प्रयत्न करील. तो विषय मार्गी लागल्यानंतर विस्तारीकरणाचे काम पूर्ण होऊन पुढच्या काही महिन्यांत ७० प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानाची वाहतूक येथून सुरू होईल,’ असे मत केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
कऱ्हाड येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आले होते. त्यावेळी ते माध्यमांची बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव डॉ. अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, ॲड. भरत पाटील, रामकृष्ण वेताळ, एकनाथ बागडी, प्रमोद शिंदे उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, ‘दिवंगत यशवंतराव चव्हाण देशाचे मोठे नेते आहेत. म्हणूनच कऱ्हाडमध्ये आल्यानंतर त्यांच्या स्मृतिस्थळाला आवर्जून अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो आहे. ते नेहमीच आपल्या प्रेरणास्थानी राहिले आहेत.
तुम्ही द्याल तेच तुम्हाला मिळते
मनसे-उद्धवसेनेच्या वादावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांना छेडले असता, उद्धवसेनेला त्यांनी खोचक टोला लगावला. सुपारी आणि नारळ फेकीवर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘जशास तसे उत्तर मिळते, तुम्ही द्याल ते तुम्हाला मिळते. हे त्यांनी ध्यानात घ्यावे.’
मराठा समाजाला महायुतीच सरकार आरक्षण देईल
महाराष्ट्रातील मराठा समाजाला महायुतीच सरकार आरक्षण देईल असा आमचा विश्वास असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण होते. आता पुन्हा राज्यात महायुतीच मराठा समाजाला न्याय देईल.
आता हा भाजपाचा बालेकिल्ला
सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. भाजपने येथे आता चांगले यश मिळवायला सुरुवात केली आहे. याबाबत विचारता सातारा जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला आहे. महायुतीचे सध्या सहा आमदार आहेत. नजीकच्या काळात सर्वच्या सर्व आमदार हे महायुतीचे असतील असेही मोहोळ यांनी सांगितले.