अपेक्षा १८ची; मिळाले ३५ कोटी
By admin | Published: January 29, 2015 09:41 PM2015-01-29T21:41:25+5:302015-01-29T23:29:56+5:30
वाळू लिलाव : तीन तालुक्यांतील पंधरा ठेक्यांची बोली पूर्ण
सातारा : वाळू लिलावाच्या पहिल्या टप्यात सातारा, कऱ्हाड आणि कोरेगाव तालुक्यांतील १५ ठेक्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बोली लावण्यात आली. यामधून महसूल विभागाला १८ कोटी ४५ लाख रुपयांची अपेक्षा होती. मात्र, लिलावातील बोलीतून ही रक्कम दुप्पट होऊन चक्क ३४ कोटी ९० लाख रुपये मिळाले आहेत.जिल्ह्यात वाळूचे एकूण ४७ ठेके असून लिलावातून सरकारी तिजोरीत कोट्यवधींचा भरणा होत असतो. गुरुवारी झालेल्या बोलीतून अपेक्षेपेक्षा दुप्पट भरणा मिळाली. पुढची फेरी खटाव, फलटण, वाई तालुक्यांसाठी १ फेबु्रवारीला होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उत्खनन विभागाच्या प्रमुख रंजना ढोकळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. सातारा, कऱ्हाड, कोरेगाव या तालुक्यातून नदी जात असल्याने या भागातील वाळू ठेक्यांसाठी लागलेल्या बोलीतून महसूल विभागाला अपेक्षेपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. त्यामुळे आगामी फेऱ्यांकडे महसूल विभागाबरोबर तालुक्यातील वाळू माफियांचे लक्ष लागून राहिले आहे.
वाळू लिलावाची ही पद्धत ई-टेंडरिंगद्वारे करण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली. (प्रतिनिधी)