‘कृष्णा’च्या सभासदांना वेठबिगार समजणाऱ्या डाॅक्टर बंधूंना मतपेटीतून हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:25 AM2021-06-23T04:25:59+5:302021-06-23T04:25:59+5:30

कऱ्हाड : कृष्णा कारखान्याची निवडणूक ही धनिकाविरोधात श्रमिकांच्या संघर्षाची किनार असलेली आहे. या संघर्षात स्वतःला कंत्राटदार आणि कारखान्याच्या ऊस ...

Expel Dr. Krishna brothers from the ballot box | ‘कृष्णा’च्या सभासदांना वेठबिगार समजणाऱ्या डाॅक्टर बंधूंना मतपेटीतून हद्दपार करा

‘कृष्णा’च्या सभासदांना वेठबिगार समजणाऱ्या डाॅक्टर बंधूंना मतपेटीतून हद्दपार करा

Next

कऱ्हाड : कृष्णा कारखान्याची निवडणूक ही धनिकाविरोधात श्रमिकांच्या संघर्षाची किनार असलेली आहे. या संघर्षात स्वतःला कंत्राटदार आणि कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना मजूर, वेठबिगार समजणाऱ्या साडूबंधू असलेल्या भोसले-मोहिते डॉक्टर जोडगोळीस सभासदांनी मतपेटीद्वारे कृष्णा कारखान्यातून कायमचे हद्दपार करावे,’ असे आवाहन कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केले.

संस्थापक पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिरसगाव, सोनकिर, आसद (ता. खानापूर) येथे सभासद संवाद दौऱ्यात अविनाश मोहिते बोलत होते. या वेळी संस्थापक पॅनलचे उमेदवार माणिकराव मोरे (देवराष्ट्रे), बाबासाहेब पाटील (येडेमच्छिंद), अधिकराव निकम (शेरे), भिमराव मांडके, सरपंच परशुराम मांडके( शिरसगाव), हणमंतराव नलवडे, शहाबुदीन मुजावर, सनी पाटील (सोनकिरे), भास्कर जाधव, संतोष माने (आसद) आदी मान्यवर उपस्थित होते.

मोहिते म्हणाले, ‘डॉ. सुरेश भोसले यांना गेटकेनमधून मिळविलेल्या आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांना रिअल इस्टेटच्या धंद्यातून मिळविलेल्या पैशाची मस्ती आहे. वाममार्गाने मिळविलेल्या संपत्तीच्या जोरावर त्यांनी सभासदांना विकत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चार-दोन हजाराच्या लालसेपोटी सभासदांनी आपले मत विकू नये. तशी चूक जर यावेळी आपण केली, स्वाभिमान गहाण टाकला तर नात्याने साडूभाऊ असलेले भोसले-मोहिते कारखान्यात एकाधिकारशाही निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत.’

‘कारखान्याचे खासगीकरण करण्यासाठी नडणाऱ्या सहा हजार ऊस उत्पादक सभासदांना डॉ. सुरेश भोसले यांनी अक्रियाशील केले आहेत. संस्थापक पॅनेलकडे कारखान्याच्या सत्तेची सूत्रे येताच अक्रियाशील सभासदांना पुन्हा कारखान्याचे सभासद करून घेतले जाईल. २०१० ते २०१५ या काळात ज्या सुविधा दिल्या त्या पुन्हा सुरू केल्या जातील. एफआरपीपेक्षा उसास उचांकी दर दिला जाईल, असे स्पष्ट करून कारखान्याचे खासगीकरण रोखण्यासाठी संस्थापक पॅनेलच्या पाठीशी रहावे,’ असे आवाहन अविनाश मोहिते यांनी या वेळी केले.

चौकट

बझार, पतसंस्था बुडविणारांना जाब विचारा....

डॉ. इंद्रजित मोहिते हे सर्व बाजूंनी अपयश आलेले गृहस्थ आहेत. त्यांना स्वतःचा दवाखाना नीट चालविता आला नाही. दिवंगत यशवंतराव मोहिते हे कारखान्याच्या संस्थापकापैकी एक होते. कारखान्यास त्यांचे नाव असल्यामुळे डॉ. मोहिते यांना कृष्णा कारखाना ही आपली खासगी जहागिरी असल्याचा भ्रम निर्माण झाला असल्याचे सांगून,यशवंत बझार आणि यशवंतराव मोहिते पतसंस्थेतील ठेवी, भागभांडवल बुडवून सभासदांना आर्थिक गंडा घालणारे डॉ. इंद्रजित मोहिते हे मत मागायला आपल्या दारात आल्यानंतर दोन्ही संस्थांचे कोट्यावधी रुपये कुठे मुरविले? याचा जाब सभासदांनी त्यांना विचारायला हवा, असेही अविनाश मोहिते म्हणाले.

Web Title: Expel Dr. Krishna brothers from the ballot box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.