विकासकर निधीच्या खर्चावरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:38 AM2021-07-29T04:38:51+5:302021-07-29T04:38:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा पालिकेत विकासकर निधीच्या खर्चाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा पालिकेत विकासकर निधीच्या खर्चाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. नगराध्यक्षा माधवी कदम यांनी लेखापाल आरती नांगरे यांना लेखी पत्र दिले असून, विकास निधीचे एक कोटी रुपये कोठे खर्च झाले, याचा खुलासा चोवीस तासांत करावा, असे आदेश दिले आहेत, तर दुसरीकडे कोणताही निधी कोठेही खर्च करण्यात आला नाही, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या विषयावरून पालिकेत नवा वाद पेटण्याची चिन्हे आता निर्माण झाली आहेत.
पालिकेने नगररचना अधिनियमाप्रमाणे विकासकर निधी जमीन भूसंपादन व विकसन कामांसाठीच वापरणे अनिवार्य आहे. आपत्कालीन परिस्थितीत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व लेखाधिकारी यांना हा निधी विशेष परवानगीने अन्यत्र वापरण्याची मुभा आहे. असे न करता पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी लेखापाल आरती नांगरे यांनी विकासकर निधीचे एक कोटी रुपए मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे परस्पर वर्ग केल्याची तक्रार सत्ताधारी सातारा विकास आघाडीचे नगरसेवक वसंत लेवे यांनी वित्त विभागाचे मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.
या प्रकरणाची नगराध्यक्षा माधवी कदम यांनी दखल घेतली असून, विकासकर निधी कोठे खर्च करण्यात आला, याचा अहवाल चोवीस तासात द्यावा, असे लेखी पत्र त्यांनी लेखाधिकारी आरती नांगरे यांना दिले आहे. मंगळवारी नगरविकास आघाडीचे विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनीही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
(कोट)
विकासकर हा पालिकेचे स्वत:चे उत्पन्न आहे. हा निधी कुठेही वापरता येऊ शकतो. मात्र, कोणताही निधी सर्वांच्या मंजुरीशिवाय कुठेही वळवता येत नाही वा खर्चही करता येत नाही. विकासकर निधी अन्यत्र वळविण्यात आलेला नाही.
- अभिजीत बापट, मुख्याधिकारी.
(कोट)
विकासकर निधी केवळ भूसंपादनासाठी खर्च करता येतो. मात्र, तो इतर ठिकाणी वापरण्यात आला. सदस्य व पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून पालिकेत वेगळाच कारभार सुरू आहे. या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.
- वसंत लेवे, नगरसेवक
लोगो : सातारा पालिका