जिल्हा रुग्णालयातील महागड्या यंत्रसामग्रीचा सर्वसामान्य रुग्णांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:41 AM2021-05-27T04:41:25+5:302021-05-27T04:41:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सध्या कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य रुग्णांना खासगी हॉस्पिटलमधील उपचार परवडणारे नाहीत; त्यामुळे अनेकांचा कल जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सध्या कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य रुग्णांना खासगी हॉस्पिटलमधील उपचार परवडणारे नाहीत; त्यामुळे अनेकांचा कल जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याकडे असून, या रुग्णालयातील सर्व महागड्या मशीन्स सुस्थितीत आहेत. परिणामी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना बसणारा आर्थिक भुर्दंड टळला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून रोज अडीच ते तीन हजार रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. सध्याच्या काळामध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरचे आहे. खासगी रुग्णालयांमध्ये एच आर सिटी करण्यासाठी दोन हजार ते अडीच हजार रुपये घेतले जातात. शिवाय एक्स-रे, ब्लड टेस्ट यांसाठी तीन ते चार हजार रुपये मोजले जातात. असा सर्व खर्च मिळून आठ ते दहा हजार रुपये एका रुग्णापाठीमागे नुसत्या तपासासाठी येत आहे. सर्वसामान्यांकडे सध्या प्रचंड मोठी आर्थिक टंचाई आहे. त्यामुळे अनेकजण जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणे पसंत करीत आहेत. जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व रुग्णांच्या तपासण्या या मोफत केल्या जात आहेत. एच आर सिटी असो एक्स-रे असो; या सर्व सुविधा मोफत देण्यात येत आहेत. अपवादात्मक परिस्थितीमध्ये रुग्णाचे नातेवाईक चाचण्या खासगी रुग्णालयामध्ये करत असतात. त्यामुळे त्यांना पैसे द्यावे लागतात अन्यथा सिविलमध्ये सर्व उपचार मोफत होत आहेत.
गत काही वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील मशीन्स नादुरुस्त होत्या. त्यामुळे रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते. मात्र सध्या रुग्णालयामध्ये सर्व सामग्री नवीन बसविण्यात आली आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री आहे. तसेच सिटी स्कॅन, एक्स-रे ही दोन मशीन सध्या कोरोना रुग्णांसाठी अत्यंत गरजेचे आहे. ही दोन्ही मशीन सिव्हिलमध्ये सुरू असल्यामुळे रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागत नाही. ही एक मोठी जमेची बाजू आहे.
चौकट : खासगी रुग्णालय न परवडणारे
सध्याच्या कोरोनाच्या महामारीमध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेणे मोठे आर्थिक भुर्दंड बसण्यासारखे आहे. अनेक रुग्णांची बिले तीन ते चार लाख रुपये येत आहेत. रोजचे अतिदक्षता विभागाचे भाडे अडीच ते तीन हजार रुपयांच्या घरात असते. सर्व शारीरिक तपासण्या अत्यंत महागड्या आहेत. काही ठिकाणी औषधोपचार आणि तपासण्यांसाठी दिवसाला आठ ते नऊ हजार रुपये घेतले जात आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयात पैसे भरून अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.
सर्वसामान्य रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे या गोष्टीमुळे परवडत नाही. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय हेच सर्वसामान्य रुग्णांचे आधारवड बनले आहे.
चौकट
... तर रुग्णांना मोठा आधार
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये एक्स-रे मशीन, सिटी स्कॅन मशीन, डोळे तपासण्याचे मशीन या तीन यंत्रांचा सध्या अत्यंत मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. या मशीनद्वारे रोज ६०० ते ७०० लोकांच्या तपासण्या केल्या जात आहेत. सर्वाधिक तपासण्या या एक्स-रे आणि एच आर सिटी केली जात आहेत. या सर्व तपासण्या खासगी रुग्णालयांमध्ये न परवडणाऱ्या आहेत.
जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या १६८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्व रुग्णांच्या तपासण्या सिव्हिलमधील मशीनच्या साहाय्याने करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे आर्थिक नुकसान टळले आहे.
कोट : जिल्हा रुग्णालयातील सर्व यंत्रसामग्री अत्यंत सुस्थितीत आहे. सर्व कोरोनावरील उपचार या यंत्रसामग्रीच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा