कऱ्हाडसह सांगलीत ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ नाटकाचे प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:35 AM2021-01-22T04:35:16+5:302021-01-22T04:35:16+5:30
मराठी माणूस हा नाटकवेडा आहे, असे म्हटले जाते. नाटक, शास्त्रीय गायन-वादन, नृत्य आदी प्रकारांचा तो मनापासून आस्वाद घेत असतो. ...
मराठी माणूस हा नाटकवेडा आहे, असे म्हटले जाते. नाटक, शास्त्रीय गायन-वादन, नृत्य आदी प्रकारांचा तो मनापासून आस्वाद घेत असतो. मात्र, गत अकरा महिन्यांपासून उद्भवलेल्या कोरोना परिस्थितीमुळे प्रत्येकजण अशा कार्यक्रमांच्या लाईव्ह मनोरंजनाला मुकला होता. या कालावधीत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मनोरंजनाची भूक भागवली. मात्र, लाईव्ह परफॉर्मन्सची मजा त्यामध्ये नव्हती. तब्बल नऊ महिन्यांनंतर शासनाने पन्नास टक्के उपस्थिती व काही अटी-शर्तींनी पुन्हा एकदा लाईव्ह कार्यक्रमास नोव्हेंबर महिन्यापासून परवानगी दिली. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून मुंबई व पुणे येथे नाटक, गायन व लावणी आदी सांस्कृतिक कार्यक्रम हाऊसफुल्ल गर्दीत धूमधडाक्यात सादर झाले. मात्र सांगली व कऱ्हाडमध्ये अद्यापही कोणतेच व्यावसायिक नाटकांचे प्रयोग झालेले नाहीत. आता २५ जानेवारी रोजी कऱ्हाडात, तर २६ जानेवारीला सांगलीत वऱ्हाड निघालय लंडनला या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या निधनानंतर मराठवाड्यातील हरहुन्नरी कलाकार संदीप पाठक यांनी ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या नाटकाचे शिवधनुष्य उचलले आणि त्याला पुन्हा वैभवाचे क्षण मिळवून दिले. मराठी रसिकांची इच्छा आणि डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांचे कलाकृती जिवंत राहावी, यादृष्टीने संदीप पाठक यांनी केलेल्या या धाडसी प्रयोगाला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. अवघ्या काही वर्षातच आता या नाटकाने पाचव्या प्रयोगाकडे गरुडझेप घेतली आहे. अशा या विश्वविक्रमी नाटकाच्या प्रयोगांचे आयोजन कऱ्हाड व सांगलीत करण्यात आलेले असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.