गॅस गळतीमुळे घरात स्फोट; दाम्पत्य जखमी, गुढेतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 06:15 PM2021-06-24T18:15:30+5:302021-06-24T18:18:17+5:30
Accident Fire Satara : गुढे, ता. पाटण येथे गुरूवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका घरातील सिलेंडरच्या पाईपला गळती लागली. यामुळे घरभर गॅस पसरून अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत पती-पत्नी गंभीर जखमी झाले. घराच्या स्वयंपाकगृहाची भिंत कोसळली. तसेच मुख्य दरवाजा तुटून जाऊन समोरच्या घरावर जाऊन आदळला. घरातील इतर साहित्यही फुटल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
सणबूर : गुढे, ता. पाटण येथे गुरूवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका घरातील सिलेंडरच्या पाईपला गळती लागली. यामुळे घरभर गॅस पसरून अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत पती-पत्नी गंभीर जखमी झाले. घराच्या स्वयंपाकगृहाची भिंत कोसळली. तसेच मुख्य दरवाजा तुटून जाऊन समोरच्या घरावर जाऊन आदळला. घरातील इतर साहित्यही फुटल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
कृष्णत रामचंद्र पाटील व त्यांची पत्नी संगीता हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गुढे येथील सेवानिवृत्त सैनिक कृष्णत पाटील यांचे माडीचे दुमजली घर आहे. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक सिलिंडरच्या टाकीला असलेल्या पाईपला गळती लागून घरभर गॅस पसरला.
सकाळच्या वेळी घराचे दरवाजे, खिडक्या बंद होत्या. त्यामुळे अचानक मोठा स्फोट झाला. यावेळी घरात कृष्णत पाटील यांच्यासह त्यांची पत्नी संगीता तसेच त्यांची दोन मुले, सुन आणि नातू असे सर्वजण घरातच होते. अचानक झालेल्या या स्फोटामुळे सर्वजण घाबरले. स्वयंपाकगृहात असणाऱ्ता संगीता यांनी गॅसवर चहा ठेवला होता.
स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. त्यामध्ये संगीता यांच्या अंगावरील साडीने पेट घेतला. मुलगा संदीप याने समय सुचकता दाखवित आग विझविली. मात्र, तोपर्यंत संगीता या भाजून जखमी झाल्या. तर कृष्णत यांच्या डोक्यालाही मार लागला. नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्या दोघांना तातडीने कृष्णा रुग्णालयात दाखल केले.
घटनेनंतर ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही तातडीने त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या घटनेत कृष्णत पाटील यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिसात झाली आहे.
घराचा पत्राही उचकटला
गॅसचा स्फोट झाल्यानंतर कृष्णत यांनी प्रसंगवधान राखत घरात वीज बंद केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. स्फोटच्या दणक्याने स्वयंपाकगृहाची भिंत पडली. घराचा दरवाजा तूटून पुढच्या घरावर जावून आपटला. घराच्या माडीवरील घड्याळ, फ्रेमसह इतर वस्तु खाली पडून फुटल्या. तर घराचा पत्राही एका ठिकाणी उचकटला आहे.