धक्कादायक! कऱ्हाडात दुचाकीमध्ये आढळली स्फोटके, बॉम्बनाशक पथकाने दुचाकीसह स्फोटके केली नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 04:58 PM2022-07-21T16:58:33+5:302022-07-21T16:59:09+5:30
एटीएममध्ये जिलेटीनच्या कांड्या घालून पोलीस आल्यानंतर तेथून पसार झालेल्या तीन आरोपींचा पोलीस अद्यापही शोध घेत आहेत
संजय पाटील
कऱ्हाड : शहरानजीक डोंगर पायथ्याला बेवारस स्थितीत आढळलेल्या दुचाकीत मोठ्या प्रमाणावर स्फोटके आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाने पाहणी केल्यानंतर ही स्फोटके सुरक्षितरीत्या निष्क्रिय करणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गुरुवारी दुपारी परिसर निर्मनुष्य करून दुचाकीतच स्फोटकांचा स्फोट करून ती नष्ट करण्यात आली.
कऱ्हाडनजीकच्या गजानन हौसिंग सोसायटीत सोमवारी पहाटे चोरट्यांनी जिलेटीनचा स्फोट करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांची पोलिसांशीही झटापट झाली होती. पोलिसांवर हल्ला करून तीन चोरटे पसार झाले होते. तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच चोरट्यांनी एटीएममध्ये लावलेली स्फोटके त्याचठिकाणी स्फोट करून नष्ट करण्यात आली होती. पोलिसांवर हल्ला करून पळून गेलेल्या तिन्ही चोरट्यांचा पोलीस अद्यापही शोध घेत आहेत. त्यातच करवडी येथे निर्जनस्थळी बुधवारी रात्री एक बेवारस दुचाकी आढळून आली.
संबंधित दुचाकी एटीएम चोरीतील आरोपींची असल्याची खात्री पोलिसांना पटली. मात्र, दुचाकीच्या डिकीमध्ये स्फोटके असल्यामुळे पोलिसांनी ती दुचाकी त्याचठिकाणी ठेवली. रात्रभर पोलिसांनी त्याठिकाणी पहारा दिला. त्यानंतर गुरुवारी सकाळी बॉम्बशोधक व नाशक पथकाला त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. या पथकाने दुचाकीची तपासणी केली असता डिकीमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटके आढळली.
स्फोटके डिकीतून बाहेर काढताना त्याचा स्फोट होण्याची शक्यता होती. त्यामुळे धोका न पत्करता हा परिसर निर्मनुष्य करून बॉम्बशोधक व नाशक पथकाने दुपारी दुचाकीतच त्या स्फोटकांचा स्फोट केला. या स्फोटात दुचाकीच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. यावेळी मोठा आवाज झाल्यामुळे परिसरही हादरून गेला.
आरोपींचा शोध सुरूच
एटीएममध्ये जिलेटीनच्या कांड्या घालून पोलीस आल्यानंतर तेथून पसार झालेल्या तीन आरोपींचा पोलीस अद्यापही शोध घेत आहेत. बुधवारी सायंकाळी हे आरोपी करवडी परिसरातील डोंगरात काही गुराख्यांना दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गुरुवारी दिवसभर आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी डोंगर पिंजून काढला. मात्र, आरोपी हाती लागलेले नाहीत.