Satara crime: ‘पेटीएम’ बंद होणार असल्याचे सांगून व्यावसायिकाला घातला चार लाखांना गंडा
By दत्ता यादव | Published: April 19, 2023 07:13 PM2023-04-19T19:13:10+5:302023-04-19T19:13:40+5:30
अज्ञातावर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सातारा : पेटीएमचे नेट बॅंकिंग बंद होणार असल्याचे सांगून एका व्यावसायिकाला तब्बल चार लाखांना गंडा घातल्याचे समोर आले असून, याप्रकरणी अज्ञातावर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, विजय रामदास कापरे (वय २८, रा. जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांचे लोणंद, ता. खंडाळा येथे केक शाॅप आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन केला. तुमचे पेटीएम नेट बॅंकिंग बंद होणार आहे, असे सांगून त्यांना मोबाइलवर एक लिंक पाठवली. ही लिंक कापरे यांनी ओपन केल्यानंतर संबंधित व्यक्तीने काही क्षणातच कापरे यांच्या वेगवेगळ्या बॅंक खात्यांतून तब्बल ४ लाख १६ हजार ६२४ रुपयांची रोकड काढली.
यानंतर कापरे यांना त्यांच्या मोबाइलवर मेसेज आला. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने लोणंद पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक इंगळे हे अधिक तपास करीत आहेत.