Satar Crime: हनीट्रॅपद्वारे एकाकडून ५० हजारांची खंडणी, सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 07:23 PM2023-07-08T19:23:22+5:302023-07-08T19:24:11+5:30
मित्राकडून पैसे मागून तक्रारदाराने केली सुटका
जिंती : हनीट्रॅपमध्ये अडकवून एका तरुणाकडून ५० हजार रुपयांची खंडणी वसूल करणाऱ्या सात जणांविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनीट्रॅपच्या या घटनेनंतर फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी ऋषिकेश प्रल्हाद बोडरे (वय २३, रा. खुंटे, ता. फलटण), धीरज अमोल लगाडे (१९), प्रतीक विजय भंडलकर (वय १९), मोनिका ऊर्फ साक्षी किसन मोहिते (वय २३, मूळ रा. शिंदेवाडी ता. फलटण, हल्ली रा. पाचबत्ती चौक, फलटण), सुहासिनी योगेश अहिवळे (वय २९, मूळ रा. मंगळवार पेठ, फलटण, हल्ली रा. बिरदेवनगर, जाधववाडी, फलटण) अशा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर दोन जण अल्पवयीन आहेत.
फलटण शहर पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ जुलैला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पाचबत्ती चौक फलटण येथे साक्षी मोहिते हिने तरुणास ‘मला तुला भेटायचं व पाहायचं आहे,’ असे म्हणून भाड्याने रूम घेत तिथे बोलविले. त्या ठिकाणी तिने इतर सहा साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. या साथीदारांनी तरुणास ‘तू कुठला आहेस, आमच्या बहिणीजवळ काय करतोस,’ असे म्हणून त्याला मारहाण करून ऋषिकेशने तरुणाकडील जबरदस्तीने मोबाईल काढून घेतला. तसेच गाडीमध्ये बसवून जुन्या आयटीआय कॉलेजच्या इमारतीजवळ नेऊन दमदाटी व मारहाण केली.
‘तुझ्यावर साक्षीला सांगून बलात्काराचा गुन्हा दाखल करतो. जर गुन्हा दाखल करायचा नसेल तर तुला दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणून तरुणास धमकावून व्हिडीओ काढला. यातील एक महिला पोलिस असल्याचे सांगून ‘तू कुणाच्या घरात घुसतो, तुला केसमध्ये गुंतवते, असे म्हणून आरसी बुक काढून घेतले. त्याच्या खात्यावर पैसे आहेत, ते पैसे पोलिसांचे खात्यावर टाकून घ्या व तो पोलिसांना लाच देतो, असे म्हणून यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करून घेते. असे म्हणून धमकावून हाताने मारहाण केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सूरज शिंदे करीत आहेत.
मित्राकडून पैसे मागून तक्रारदाराने केली सुटका
फिर्यादी तरुणास पैशाची मागणी केली त्या वेळी त्याकडे काहीच पैसे नव्हते. पण, या टोळीने कुठूनही पैसे आण नाहीतर सोडणार नाही, अशी भूमिका घेतल्याने त्याने मित्राकडून ऑनलाइन पैसे मागवले. ते ५० हजार रुपये या टोळक्याने एटीएममधून परस्पर काढून घेतले.