महाबळेश्वरात पसरली हिमकणांची चादर; वेण्णालेक, लिंगमळा परिसरात पाच अंशांखाली पारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 03:42 PM2022-02-05T15:42:57+5:302022-02-05T15:44:08+5:30
दोन-तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने जनजीवन विस्खळीत
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळख असलेले महाबळेश्वर काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने गारठले आहे. वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील तापमान शनिवारी पाच अंश इतके खाली गेले होते. यामुळे या भागामध्ये अनेक ठिकाणी हिमकणांचा सडा पडल्याचे विलोभनीय दृश्य पाहावयास मिळले.
वेण्णालेकच्या लोखंडी जेटी, वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील वाहनांचे छत, स्ट्रॉबेरीच्या शेतात फुलांवर तसेच येथील स्मृतिवन परिसरात हिमकणांचा सडा पाहावयास मिळाला.
देश-विदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला काही दिवसांपासून हुडहुडी भरली आहे. दोन-तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने जनजीवन विस्खळीत झाले आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे.
महाबळेश्वर शहरासह वेण्णालेक, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. या थंडीने शनिवारी पहाटे वेण्णालेक, नौकाविहाराच्या लोखंडी जेटी, परिसरातील फुलझाडे, वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील उभ्या असलेले वाहनांचे टप, झाडाझुडपांसह पानांवर अनेक ठिकाणी हिमकण जमा झाले होते. लिंगमळा परिसरातील स्मृतिवनात तर दिसेल तेथे लांबच लांब हिमकणांचा गालिचा अंथरल्याचे दिसत होते.