उन्हातच थंडीचा कडाका, मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये हिमकण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 11:22 AM2023-03-27T11:22:18+5:302023-03-27T11:23:42+5:30
पर्यटकांनी उन्हाळ्यात ''काश्मीर''चाच जणू अनुभव घेतला
अजित जाधव
महाबळेश्वर : उन्हाचा पारा वाढत असतानाच वातावरणात अचानक कमालीचा बदल झाला आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी एक आठवड्यापासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. स्थानिकांसह पर्यटकांना एन उन्हाळी हंगामात ''काश्मीर'' चाच जणू अनुभव आला. आज, सोमवारी पहाटे वेण्णालेकसह परिसरात दवबिंदू हिमकणात रूपांतरण झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
महाबळेश्वर शहरासह वेण्णालेक परिसर लिंगमळा व महाबळेश्वर तालुक्यात थंडी प्रमाण चांगले वाढले असून या सोबतच गार वारे वाहत आहेत. शालेय परीक्षा सुरू असल्यामुळे पर्यटकाची तुरळक गर्दी असते. परंतु शुक्रवार, शनिवार, रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत असतात.
आज, सोमवारी पहाटे महाबळेश्वर बाजारपेठ परिसरांत १३.८ अंश तापमान होते. तर वेण्णालेक व लिंगमळा परिसरांत ९.२ अंश तापमान होते. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनी एन उन्हाळ्यात ''काश्मीर'' चाच जणू अनुभव घेतला. बदललेल्या वातावरणाने पहाटे वेण्णालेकसह लगतच्या परिसरात दवबिंदू हिमकणात रूपांतरण झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. वेण्णालेक जेट्टीसह परिसरातील वाहनांच्या टपांवर मोठ्या प्रमाणावर हिमकण जमा झाले होते.