चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी
By admin | Published: June 21, 2015 11:10 PM2015-06-21T23:10:26+5:302015-06-22T00:15:10+5:30
वीजपुरवठा खंडित : चोवीस तासात ११0 मिलिमीटर पावसाची नोंद
शिराळा/वारणावती/सागाव : चांदोली धरण परिसरात गेल्या २४ तासात ११० मिलिमीटर पाऊस झाला असून अतिवृष्टीची नोंद झाली आहे. संततधार पावसाने धरणाची पाणी पातळी पाऊण मीटरने वाढली आहे. मुसळधार पावसामुळे परिसरातील वीज २४ तासांपासून खंडित झाली आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील सोनवडे, मणदूर, आरळा, चांदोली परिसरात गेले दोन दिवस संततधार सुरू आहे. पावसामुळे परिसरातील भात पिकात पाणी साचले आहे. गेल्या ४८ तासात १४५ मि.मी., तर २४ तासात ११0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणातील पाणी पातळी (0.७५ मीटरने) वाढली आहे. सध्या धरणात १८.६८ टी.एम.सी. (५२९.१७ द. ल. घ. मी.) पाणीसाठा आहे, तर वीज निर्मिती केंद्रातून ५४२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. संततधार पावसाने व विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीतही काहीशी वाढ झाली आहे. आरळा-शित्तूर रस्त्यावरील वारणा नदीजवळ दलदलीमुळे लोकांची कसरत सुरू आहे. तालुक्यातील सागाव, नाटोली, चिखली, कांदे, भाटशिरगाव, वाडीभागाई, ढोलेवाडी, कणदूर, पुनवत, फुफिरे परिसरात शनिवारी रात्रीपासून संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी शेताचे बांध फुटले असून, शेतकऱ्यांची आडसाली उसाची लागण पडली आहे. भाताच्या व उसाच्या पिकामध्ये पाणी साचले आहे. विहिरीवरील मोटारी काढून ठेवण्यासाठी धावपळ सुरू असून जनावरेही माळरानातून हलविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग रविवारी सुरू होती. मान्सून सक्रिय झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)/
एकूण पाऊस
चोवीस तासातील व आतापर्यंत झालेला पाऊस कंसात असा - शिराळा ५७ (१२० मि.मी.), शिरशी ३२ (६६), कोकरुड ६० (१५०), चरण ४५ (१५४), सागाव ६८ (१५०), मांगले ७१ (१५१), चांदोली धरण परिसर ११० (२७०).