हद्दवाढ निश्चित पण.. इलेक्शन के बाद !

By admin | Published: September 9, 2016 11:21 PM2016-09-09T23:21:44+5:302016-09-10T00:37:43+5:30

उपनगरांच्या निवडणुका पुढील वर्षी : ‘लोकमत’च्या विशेष वृत्तानंतर खलबते सुरू; उपनगरांना नगराध्यक्षपदासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागणार

Extremely decided but after the election! | हद्दवाढ निश्चित पण.. इलेक्शन के बाद !

हद्दवाढ निश्चित पण.. इलेक्शन के बाद !

Next

सातारा : साताऱ्याच्या हद्दवाढीला मुख्यमंत्र्यांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर पालिका वर्तुळात आता राजकीय खलबते सुरू झाली आहेत. हद्दवाढीची अधिसूचना जानेवारीत निघणार असल्याने नव्याने समाविष्ट झालेल्या उपनगरांशिवाय पालिकेची निवडणूक होणार आहे. मात्र हद्दवाढ झाल्यानंतर २०१७ मध्ये वाढीव उपनगरांच्या प्रभागातील निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून धुळखात कोनाड्यात पडलेल्या सातारा हद्दवाढीच्या प्रस्तावावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केल्याने हद्दवाढीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नवीन रचनेनुसार सातारा पालिकेमध्ये २० प्रभाग आणि ४० वॉर्ड आहेत.
पालिकेची निवडणूक होण्यापूर्वी शाहूपुरी, शाहूनगर, कोडोली, गोडोली आणि खेड या उपनगरांचा समावेश सातारा पालिकेच्या हद्दीत झाला असता तर नव्या रचनेनुसार ५० नगरसेवक पालिकेत समाविष्ट झाले असते. मात्र, हद्दवाढ लांबल्याने पूर्वीपासून जो भाग पालिकेत समाविष्ट आहे. त्या भागातील लोकांना मतदान करता येणार आहे. हद्दवाढीचा अधिकृत अद्यादेश जानेवारी महिन्यात काढण्यात येणार आहे. त्यानंतर हरकतींसाठी महिनाभर मुदत असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होऊन त्याबाबतचा अहवाल राज्यसरकारकडे पाठविण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत पालिकेची निवडणूक ठरल्याप्रमाणे डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे आता जवळपास निश्चीत झाले आहे. तर उपनगरांची निवडणूक हद्दवाढीनंतर घेण्यात येणार आहे. हद्दवाढ झाल्यानंतर नगरपालिकेत कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या भरतीसह अन्य बदल होणार आहेत. डिसेंबर महिन्यात पालिकेची निवडणूक झाल्यानंतर सातारा हद्दीत समाविष्ट होणाऱ्या उपनगरांची पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. मात्र, उपनगराला नगराध्यक्षपद भूषविता येणार नाही. त्यासाठी या उपनगरांना पाच वर्ष वाट पाहावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सातारच्या हद्दीवाढीवर स्वाक्षरी केल्यानंतर उपनगरातील अनेकांनी लवकरात लवकर हरकती मागवाव्यात, अशी मागणी केलीय.
सातारची हद्दवाढ भाजमुळेच रखडली गेली, असा सूर उमटू लागला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याच्या हद्दवाढीवर तातडीने निर्णय घेऊन स्वाक्षरी केल्यामुळे विरोधकांची बोलती बंद झाली आहे.
ही हद्दवाढ आता केंव्हाही झाली तरी चालेल. मात्र मुख्यमंत्र्यांकडून त्याला ग्रीन सिग्नल मिळणे गरजेचे होते. या हद्दवाढीमुळे साताऱ्याच्या विकासकामांना गती येणार आहे. (प्रतिनिधी)

आता आमची ही शेवटची निवडणूक
उपगनगरांमध्ये ग्रामपंचायत असल्यामुळे सदस्यांना चांगला मान असतो. सातारा पालिकेच्या हद्दीत समावेश झाल्यानंतर या लोकांचे महत्त्व कमी होणार आहे. त्यामुळे साताऱ्याची हद्दवाढ पालिकेची निवडणूक झाल्यानंतर होणार असल्याने हा निर्णय ग्रामपंचायत सदस्यांच्या पथ्यावर पडला आहे. हा निर्णय उशिरा झाल्यामुळे ‘बर झालं.. आता आम्हाला ग्रामपंचायत निवडणूक लढविता येईल,’ अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया सदस्य बोलून दाखवत आहेत.


पालिकेत चौकशीसाठी झाली गर्दी...
साताऱ्याच्या हद्दवाढीवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाले. त्यानंतर शुक्रवारी याची माहिती घेण्यासाठी नगरसेवकांपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनीच पालिकेत धाव घेतली. कधीपर्यंत हद्दवाढ होणार, नेमकी प्रक्रिया काय आहे. यावरून राजकीय गणिते ठरणार असल्याने हद्दवाढीची चौकशी करण्यासाठी पालिकेत गर्दी झाली होती.

Web Title: Extremely decided but after the election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.