नवे कपडे पाहून खुलले चिमुरड्यांचे चेहरे !
By admin | Published: September 13, 2015 09:11 PM2015-09-13T21:11:01+5:302015-09-13T22:18:06+5:30
महिगावची कातकरी वस्ती : जयश्री गिरी यांच्या हस्ते शालेय गणवेश वाटप
कुडाळ : शाळा शिकण्याची, इतर मुलांप्रमाणे खूप मोठे होण्याचे स्वप्ने या मुलांनीही पाहिलं; पण परिस्थिती साथ देत नाही... चांगली पुस्तकं, स्वच्छ कपडे मिळत नसल्याने शिकण्याची इच्छाच राहत नाही. याच मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी महिगाव येथील कातकरी वस्तीमधील वीस विद्यार्थ्यांना उपसरपंच जयश्री गिरी यांच्या हस्ते गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.महिगाव, ता. जावळीच्या जवळ असलेल्या कातकरी वस्तीमधील विद्यार्थ्यांना इतर मुलांच्या बरोबरीने शिक्षण मिळावे म्हणून शाळा आहे. मात्र, भौतिक सुविधा पुरेशा मिळत नाहीत. त्यामुळे या मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी गिरी यांच्या हस्ते गणवेश व शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. नवा गणवेश पाहून या वस्तीमधील मुलांची चेहरे खुलली होती. त्यांचा आनंद चेहऱ्यावरून लपत नव्हता; पण हे दृश्य पाहणाऱ्यांच्या पापण्याच्या कडा मात्र ओलावल्या होत्या. या वस्तीवरील अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी गावातील युवक मयूर भोसले हा प्रयत्न करत आहे. वस्तीमधीलच्या वीस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. यावेळी सदस्य कुसूम जाधव, जगन वाघे, जिजाबाई वाघे, कल्पना भोसले, रोहिदास भोसले, मयूर भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गावालगत असलेल्या वस्तीमधील नागरिकांना अवश्यक सुविधा पुरवून त्यांच्या वस्तीतील विकासकामांना प्राधान्य देऊन, या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- जयश्री गिरी, उपसरपंच महिगाव.