कवठेत ३० ऑक्सिजन बेडची सुविधा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:30 AM2021-04-29T04:30:29+5:302021-04-29T04:30:29+5:30
वेळे : कवठे (ता. वाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर गतवर्षीपासून सुरू करण्यात आले होते. ...
वेळे : कवठे (ता. वाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर गतवर्षीपासून सुरू करण्यात आले होते. या आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक अवस्थेतील कोरोनाबाधित रुग्णांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
सध्या या आरोग्य केंद्रामध्ये ३० बेड्स उपलब्ध असून, या ठिकाणी कोरोनो रुग्णांच्यावर चांगल्या पद्धतीने देखभाल करण्यात येत आहे. मात्र, हे केंद्र हे कोरोना केअर केंद्र असल्याने जर या ठिकाणी दाखल झालेला रुग्ण अत्यवस्थ होऊ लागला व त्याची ऑक्सिजन पातळी खालावू लागली तर त्याला पुढील उपचारासाठी तातडीने वाई किंवा सातारा येथील शासकीय किंवा खासगी कोविड केंद्रामध्ये दाखल करावे लागत होते. यामध्ये रुग्णाला ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी दवाखान्याच्या उपलब्धतेपासून ते ऑक्सिजन बेडपर्यंत रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना तसेच लोकप्रतिनिधींनाही सद्यस्थितीत तारेवरची कसरत करावी लागत होती. तरीसुद्धा तालुक्यातील कित्येक रुग्ण एक दोन दिवस ऑक्सिजन बेडच्या प्रतीक्षेत असल्याचे सध्याचे चित्र होते. याबाबत असंख्य लोकांनी लोकप्रतिनिधींच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येनुसार ऑक्सिजन बेडची कमतरता भासू लागल्याने ही बाब आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये मांडण्यात आली व आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद फंडातून कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ३० ऑक्सिजन बेडसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला.
प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, माजी कृषी सभापती मनोज पवार, खंडाळा पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे, तहसीलदार रणजित भोसले, खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे, वाई नगरपरिषदेचे उपनराध्यक्ष अनिल सावंत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय कुसुरकर, शशिकांत पिसाळ, मदन भोसले, महादेव मस्कर, दिलीपराव पिसाळ, उपसभापती भय्या डोंगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप यादव यांच्या उपस्थितीत या बेड्च्या सुविधेचे उदघाटन करण्यात आले.
कोट..
कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या पहिल्या मजल्यावर उपलब्ध असेलेल्या ३० बेड्सना ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून दिली असल्याने आरोग्य यंत्रणेचा ऑक्सिजन बेड मिळविण्याचा बहुतांश ताण कमी होईल तसेच या आरोग्यकेंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर आणखी ३० बेड्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
-मकरंद पाटील,आमदार